ललित झांबरे
उमेश कुलकर्णी....आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर हे नाव ऐकलंय कधी? पन्नास वर्षांपूर्वी भारतासाठी चार कसोटी सामने खेळलेला हा डावखूरा मध्यमगती गोलंदाज..या पलीकडे या खेळाडूची फारशी विशेष नोंद नसली तरी क्रिकेटच्या इतिहासात त्यांच्या नावावर अशी एक नोंद आहे जी कुणी मोडणे तर सोडाच पण बरोबरीसुध्दा करू शकणार नाही. पतियाळाचे महाराज यादवेंद्रसिंग, एकनाथ सोलकर आणि झहीर खान ही याच पंक्तीतील आणखी काही नावं. या चौघांच्या नावावर क्रिकेटच्या इतिहासातील अगदी वैशिष्ट्यपूर्ण नोंद आहे आणि ती म्हणजे U- यू (Umesh-उमेश), Y- वाय (Yadvendra- यादवेंद्र), E (Eknath), आणि Z- झेड (Zaheer- झहीर) हे त्या-त्या आद्याक्षरानुसार नाव सुरू होणारे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत.
इंग्रजी वर्णमालेत असलेल्या A-Z या आद्याक्षरांनुसार नाव सुरु होणारे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कोण याचा शोध घेतला असता ही अनोखी बाब समोर आली. यापैकी महाराजा यादवेंद्रसिंह आणि उमेश कुलकर्णी यांच्या नावावर कसोटी क्रिकेटसाठी, एकनाथ सोलकर यांच्या नावावर वन डे क्रिकेटसाठी आणि झहीर खानच्या नावावर टी-20 क्रिकेटसाठी ही नोंद आहे.
पतियाळाचे महाराज यादवेंद्रसिंह महेंद्र बहादूर हे एकच कसोटी सामना खेळले 1934 मध्ये, परंतु तोवर 'वाय' आद्याक्षराने नाव सुरु होणारा एकही कसोटीपटू नव्हता.
अगदी असेच घडले अलिबागच्या उमेश कुलकर्णींच्या बाबतीत. 1967 मध्ये त्यांना भारताने कसोटीत संधी दिली आणि कसोटी क्रिकेटला 'यू' आद्याक्षराचा पहिला क्रिकेटपटू मिळाला. एवढेच नाही तर उमेश यांच्या 'यू'नेच कसोटीपटूंच्या नावाची 'ए टू झेड' ही वर्णमाला पूर्ण केली. त्यांच्याआधी अगदी 'एक्स', क्यू, ओ...अशा आद्याक्षरांचेसुध्दा क्रिकेटपटू कसोटी खेळून गेले पण 1967 पर्यंत यू ने नाव सुरू होणारा कसोटीपटू नव्हता.
वन डे इंटरनॕशनलमध्ये एकनाथ सोलकर यांनी 1974 मध्ये 'इ' आद्याक्षराचा भोपळा फोडला तर झहीरने टी-20 इंटरनॅशनलमध्ये 'झेड' आद्याक्षरांच्या क्रिकेटपटूंच्या यादीची सुरुवात केली.
जसे उमेश कुलकर्णींनी कसोटीपटूंची इंग्रजी वर्णमाला पूर्ण केली...वन डे इंटरनॅशनलसाठी हा मान वेस्ट इंडिजच्या झेवियर मार्शलकडे (एक्स - 2005) जातो आणि टी-20 इंटरनॅशनलसाठी दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉककडे (क्यू- 2012) हा मान जातो.
यापैकी झेवियर मार्शल हा एकमेव असा क्रिकेटपटू आहे ज्याने दोन प्रकारच्या क्रिकेटमध्ये (वन डे आणि टी-20) आपल्या 'एक्स' या आद्याक्षराचा पहिला क्रिकेटपटू ठरण्याचा मान मिवला आहे.
आद्याक्षरांनुसार पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
अक्षर कसोटी वन-डे टी- 20
ए 1877 1971 2005 बी 1877 1971 2005 सी 1877 1973 2005 डी 1877 1972 2005 इ 1877 1974 2006 एफ 1877 1973 2006 जी 1877 1973 2005 एच 1877 1971 2005 आय 1882 1973 2006 जे 1877 1971 2005 के 1907 1971 2005 एल 1879 1973 2006 एम 1887 1971 2005 एन 1877 1973 2005 ओ 1889 1992 2007 पी 1880 1971 2005 क्यू 1929 1983 2012 आर 1881 1971 2005 एस 1879 1973 2005 टी 1877 1975 2006 यू 1967 1991 2007 व्ही 1879 1973 2005 डब्ल्यू 1877 1971 2006 एक्स 1930 2005 2008 वाय 1934 1975 2006 झेड 1952 1975 2006