नवी दिल्ली : ‘साऊथम्पटनचे वातावरण उष्ण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या डब्ल्यूटीसी अंतिम लढतीसाठी भारतीय संघ रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोन्ही फिरकी गोलंदाजांना अंतिम संघात स्थान देण्याची शक्यता आहे. कारण हळूहळू खेळपट्टी कोरडी होईल आणि अशा परिस्थितीत फिरकीपटूंना अधिक फायदा मिळेल आणि रवींद्र जडेजासह रविचंद्रन अश्विन हे दोघेही भारतासाठी मॅचविनर ठरू शकतील,’ असे मत भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.
गुरुवारपासून रंगणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीसाठी गावसकर यांचा समालोचक म्हणून सहभाग आहे. सध्या ते साऊथम्पटन येथेच आहेत. वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, ‘साऊथम्प्टन येथील वातावरण गेल्या काही दिवसांपासून अत्यंत उष्ण झाले आहे. अशा परिस्थितीत खेळपट्टी कोरडी पडेल आणि फिरकीपटूंना अधिक मदत होईल. त्यामुळेच अश्विन आणि जडेजा या दोघांनाही या सामन्यात संधी मिळू शकते.’ गावसकर पुढे म्हणाले की, ‘अश्विन आणि जडेजा दोघेही फलंदाज म्हणूनही उपयुक्त आहेत. त्यांच्या समावेशामुळे भारताची फलंदाजी खोलवर जाते. ’
‘हिटमॅन चमकणार’२०१९ सालच्या इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा तुफान फॉर्ममध्ये होता. त्याने स्पर्धेत ५ शतके ठोकण्याचा विश्वविक्रम केला. हाच फॉर्म रोहित यावेळी कायम राखील, असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वी रोहितने येथे विश्वचषक स्पर्धेत पाच शतके ठोकली होती. साऊथम्पटन येथेच त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी केली होती. आता त्याच्याकडे अधिक अनुभव असून, मला खात्री आहे की, हाच फॉर्म कायम राखण्यात रोहित यशस्वी ठरेल.’
अश्विन आणि जडेजाला खेळवावे : सचिनन्यूझीलंडविरुद्ध परिस्थिती फिरकीपटूंना पूरक असल्याचे जाणवत असल्याने भारतीय संघाने अश्विन आणि जडेजा या दोघांनाही अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देणे उपयुक्त ठरेल, असे मत मास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. भारतीय संघ अखेरच्या दोन दिवसात फिरकीच्या बळावर बाजी मारू शकेल,’ असा अंदाज सचिनने व्यक्त केला.