Wisden’s Cricketers of the Year - भारताचे दोन स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) व रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांचा विस्डन क्रिकेट ऑफ दी ईअर २०२२च्या पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. एकाच वर्षी विस्डनचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार भारताच्या दोन खेळाडूंना मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली. रोहित व बुमराह यांच्यासह न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे, इंग्लंडचा ऑली रॉबिन्सन व दक्षिण आफ्रिकेची डॅन व्हॅन निएकर्क यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याला पुरुष क्रिकेटपटूंमधील, तर आफ्रिकेची लिएली ली हिला महिला क्रिकेटपटूंधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये हा मान पटकावला. भारताच्या इंग्लंड दौऱ्यावरील मालिकेत जसप्रीत बुमराहने कमालीची कामगिरी केली होती. तसेच लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटी विजयात त्याने गोलंदाजी व फलंदाजीतही योगदान दिले होते. ओव्हलमध्ये त्याने मॅच विनिंग कामगिरी केली होती. त्यामुळेच भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील उर्वरित कसोटी येत्या जुलैमध्ये खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंडचा कॉनवे याने कसोटी पदार्पणात इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या पहिल्याच फलंदाजाचा मान पटकावला होता. २९ वर्षीय खेळाडूने एडबेस्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात ८० धावांची खेळी करून न्यूझीलंडला २२ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने २०२१मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेट गाजवले. त्याने २७ ट्वेंटी-२०त ७२.८८च्या सरासरीने १३२९ धावा चोपल्या. त्यात एक शतक व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १००० धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.