लंडन : बार्बाडोसमध्ये जन्मलेला अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चर पुढील वर्षी इंग्लंडकडून विश्वचषक आणि अॅशेस मालिका खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या पात्रता निकषात बदल करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. त्यानुसार इंग्लंडमध्ये न जन्मलेला, परंतु येथे तीन वर्ष वास्तव्यास असलेला खेळाडू इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करू शकतो. याआधी वास्तव्याची अट सात वर्ष होती. नव्या नियमाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2019 पासून होणार आहे. याचा अर्थ वेस्ट इंडिज दौऱ्यात तो इंग्लंड संघाकडून पदार्पण करू शकतो.
23 वर्षीय आर्चर 2015 पासून ससेक्स क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे आणि जगातील बऱ्याच ट्वेंटी-20 लीगमध्ये त्याने आपली छाप पाडली आहे. गतवर्षी इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाने त्याला 7.2 कोटी रुपयांत चमूत दाखल करून घेतले होते. आर्चर हा बिग बॅश लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतो. त्याने ऑक्टोबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याने ब्रिटीश पासपोर्ट मिळवले आणि 2015 साली तो लंडनमध्ये स्थायिक झाला.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नियम बदलल्यानंतर आर्चरने ट्विट केले. त्यात त्याने घरच्यांसमोर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास मिळाल्यास आनंद होईल, असे लिहिले.