ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघात बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. त्याची सुरुवात मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफपासून झालेली दिसेल. राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्यास नकार दिल्यानंतर BCCI ने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला अन् तो गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir) नावावर येऊन थांबला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर गौतम गंभीरची टीम इंडियाचा नवीन प्रशिक्षक म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे. गौतमने संघ अन् सपोर्ट स्टाफ निवडण्याचे सारे स्वातंत्र्य मागितले होते आणि BCCI ने ही मागणी मान्य केल्याचे समजतेय.
त्यात आता टीम इंडियाचा फिल्डिंग कोच म्हणून गौतम गंभीरसोबत काम केलेली व्यक्तीची निवड होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. भारतीय संघाचे सध्याचे फिल्डिंग कोच टी दिलीप यांचा कार्यकाळही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे आणि ते पुन्हा या पदावर काम करण्यास इच्छुक आहेत की नाही, याबाबत स्पष्टता नाही. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू व जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होड्स ( Jonty Rhodes) याचे नाव टीम इंडियाचा भविष्याचा फिल्डिंग कोच म्हणून पुढे आले आहे. जाँटी आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा फिल्डिंग कोच आहे आणि त्याने दोन वर्ष गौतम गंभीरसोबत काम केले आहे. गौतम तेव्हा LSG चा मेंटॉर होता.
सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॉन्टीने भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन फिल्डिंग कोच या पदासाठी अर्ज केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूने २०१९ मध्ये देखील या पदासाठी अर्ज केला होता, परंतु मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आर श्रीधर यांना पुन्हा नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये जाँटी पुन्हा इच्छुक होता, परंतु राहुल द्रविडने भारतीय सपोर्ट स्टाफ निवडला आणि टी दिलीप भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनले.
BCCI एखाद्या व्यक्तीला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होण्यासाठी शॉर्टलिस्ट करू शकते, परंतु शेवटी मुख्य प्रशिक्षक त्याच्या कोचिंग स्टाफची निवड करण्याचा निर्णय घेतात. रिपोर्ट्सनुसार, कोचिंग स्टाफच्या बाबतीत मोठा फेरफार होऊ शकतो. केवळ मुख्य प्रशिक्षकच नाही तर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकही बदलले जाऊ शकतात. जाँटी फिल्डिंग कोच झाल्यास टीम इंडियातील बऱ्याच खेळाडूंना फिटनेसवर अधिक मेहनत घ्यावी लागणार हे निश्चित आहे.
जॉन्टी ऱ्होड्सची कोचिंग कारकीर्दजॉन्टी सध्या इंडियन प्रीमियर लीगमधील लखनौ सुपर जायंट्स आणि SA20 मधील डर्बन सुपर जायंट्ससाठी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. या दोन फ्रँचायझींव्यतिरिक्त त्याने पंजाब किंग्ज, स्वीडन क्रिकेट फेडरेशन आणि श्रीलंका क्रिकेट संघासोबतही काम केले आहे.