आपल्या मुलानं देशासाठी क्रिकेट खेळावं ही इच्छा उराशी बाळगलेले मोहम्मद सिराजचे वडील त्यांचं स्वप्न पूर्ण होताना पाहण्याआधीच हे जग सोडून गेले. आज जर ते हयात असते तर त्यांना आपल्या मुलानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक बळी घेतले याचा नक्कीच अभिमान वाटला असता. भारतीय संघानं २-१ ने मालिका जिंकली आणि यात मोहम्मद सिराजनं भारताकडून १३ विकेट्स घेतल्या. ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियानं मिळवलेल्या यशाचं सेलिब्रेशन सिराजच्या हैदराबादमध्येही करण्यात आलं.
सिराजच्या वडिलांचं २० नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं. याच्या एक आठवड्यापूर्वीच सिराज ऑस्ट्रेलियात पोहोचला होता आणि कोरोनाच्या नियमांमुळे सिराजला त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहता आलं नाही. मोहम्मद सिराजने मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण केलं. त्यानंतर ब्रिस्बेन कसोटीत पाच विकेट्स घेऊन भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला.
३६ धावांत गारद झालेला संघ ऑस्ट्रेलियाला कसा भारी पडला; खुद्द रहाणेनंच 'मास्टरप्लान' सांगितला
सिराजसाठी इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. काही वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये सिराज त्याच्याकडे स्पोर्ट्स शूज नसल्यामुळे अनवाणी पायांनीच गोलंदाजी करत होता. येत्या मार्च महिन्यात सिराज वयाची २७ वर्ष पूर्ण करतोय. सिराज एका सामान्य कुटुंबाचं प्रतिनिधित्व करतो. त्याचे वडील एक ऑटोरिक्षा ड्रायव्हर होते. तर सिराजचा भाऊ त्याच्या वडिलांना कामात मदत करत असे.
ना कोरोनाचा बहाणा...ना स्लेजिंगचा हातखंडा...टीम इंडियानं असा रोवला विजयाचा झेंडा!
सिराजच्या आयुष्यात आजवर अनेक अडथळे आलेत. आर्थिक चणचण असतानाही त्याचे वडिल त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्याला क्रिकेट खेळू दिलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच मोहम्मद सिराजनं आपल्या वडिलांना गमवलं आणि त्याला मोठा धक्काच बसला होता. बीसीसीआयनं सिराजला माघारी परतण्याचा पर्याय दिला होता. पण सिराजनं भारतीय संघासोबतच राहणं पसंत केलं. तेव्हा सिराजनं भरलेल्या मनानं काळजावर दगड ठेवून म्हटलं होतं की, "माझे वडील मला सर्वात जास्त पाठिंबा देत आले आहेत. ही माझ्यासाठी सर्वात मोठी परीक्षा आहे. त्यांचंच स्वप्न होतं की मी भारतासाठी क्रिकेट खेळावं आणि देशाचं नाव मोठं करावं"
''ये नया भारत है...घर में घुसकर मारता है'', सेहवागचं हटके ट्विट; टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव
सिराजचा मोठा भाऊ इस्माईल सांगतो, "माझे वडील कसोटी क्रिकेटचे चाहते होते. कसोटी क्रिकेट म्हणजेच खरं क्रिकेट आहे, असं ते नेहमी सिराजला सांगत असत. ते वनडे किंवा टी-२० क्रिकेटचे फॅन नव्हते. कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी ते मोहम्मदला नेहमी प्रोत्साहन द्यायचे"
सिराजचा जन्म १९९४ साली हैदरबादच्या फर्स्ट लान्सर परिसरात झाला. तेव्हा कुटुंबिय एका भाड्याच्या घरात राहत होते. २०१७ साली मोहम्मद सिराजची जेव्हा टी-२० क्रिकेटसाठी निवड झाली तेव्हा त्यांनी स्वत:चं घर खरेदी केलं आणि त्यानं वडिलांना आता ऑटोरिक्षा चालवावी लागणार नाही याची काळजी घेतली.
भारताच्या विजयानंतर ट्विटरवर राहुल द्रविडचीच हवा, फॅन्स म्हणतात...द्रविडच 'मालिकावीर'!
सिराजने आजवर कोणतीच अधिकृत क्रिकेट कोचिंग घेतलेली नाही. सुरुवातीच्या काळात सिराज त्याच्या घराजवळच्या मैदानात टेनिस बॉलने सराव करायचा. सिराजच्या मित्रांचंही त्याच्या आजवरच्या यशात मोठं योगदान राहीलं आहे. मोहम्मद सिराजला सुरुवातीला एक चांगला फलंदाज व्हायचं होतं, असं त्याचा मित्र अमजद खान सांगतो. पण सिराजकडून चांगली गोलंदाजी होऊ लागली. तो गोलंदाजीच खूप चांगली कामगिरी करू लागला आणि त्याला मिळणाऱ्या यशानं आम्हाला अभिमान वाटू लागला, असंही अमजद पुढे म्हणाला.
सिराजने २०१५-१६ मध्ये हैदराबादकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर विजय हजारे करंडकमध्येही तो खेळला. सिराजने हैदराबादच्या अंडर-२३ संघाकडूनही गोलंदाजी केली आहे. आयपीएलमध्ये सिराज सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो. याआधी तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता.