Mumbai Indians, IPL 2022: मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने पराभवाचं पाणी पाजलं. १५व्या षटकापर्यंत हातात असलेला सामना मुंबईने शेवटच्या पाच षटकांत गमावला. मुंबईच्या गोलंदाजांना दिल्लीच्या अक्षर पटेल-ललित यादव जोडीने धू धू धुतलं. त्यामुळे मुंबईची २०१३ पासून सलामीचा सामना हारण्याची लाजिरवाणी परंपरा यंदाही सुरूच राहिली. पण आता दुसऱ्या सामन्यात आधी मुंबईच्या संघाने चाहत्यांना जम्बो खुशखबर दिली आहे. बोटाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे.
मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव संघात सामील झाला!
मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे. या सामन्यापूर्वी गुरुवारी मुंबई इंडियन्स संघात सूर्या सामील झाला. मुंबईने गुरुवारी सांगितले की, सूर्यकुमारने त्याचं क्वारंटाईन पूर्ण केलं आहे आणि तो संघात सामील झाला आहे. गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान बोटाला दुखापत झाल्यानंतर सूर्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होता. त्यामुळेच सलामीच्या सामन्यात तो खेळू शकला नव्हता.
मुंबई इंडियन्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव त्याचा क्वारंटाईन संपवून बाहेर आला आहे. त्याने त्याचे सहकारी किरॉन पोलार्ड, इशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह सराव सत्रात भाग घेतला. त्याच्या उपस्थितीने संघ उत्साहित झाला आहे. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात सूर्या संघासोबत नसताना अनमोलप्रीत सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यात आले होते. त्याच्या जागी सूर्या संघात परतणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.
सूर्यकुमार यादवने IPLमध्ये आतापर्यंत ११४ सामने खेळले असून २ हजार ३४१ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १३ अर्धशतके झळकावली आहेत. ८२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. सूर्यकुमार यादव मुंबईत येण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्ससोबत होता. मात्र मुंबईत आल्यापासून त्याच्या खेळात कमालीची चमक दिसू लागली. गेल्या दोन-तीन हंगामात तो संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक ठरला आहे.