नवी दिल्ली - दिल्लीच्या फिरोझशहा कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या तिस-या क्रिकेट कसोटी सामन्यात श्रीलंकन क्रिकेटपटू प्रदूषणाने हैराण झाले आहेत. लंकेचा वेगवान गोलंदाज सूरंगा लकमलने तर मैदानावरच उलटी केली. त्याच्यावर उपचारासाठी मैदानावर फिजियोना यावे लागले. लकमलच्या जागी अखेर दासन शानाका बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानावर आला.
दिल्लीतील प्रदूषित हवेमुळे श्वसनाचा त्रास होत असल्याने मंगळवारी दुस-या डावात भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना श्रीलंकन क्रिकेटपटू तोंडाला मास्क लावून फिल्डिंग करत होते. रविवारी सुद्धा दिल्लीतील प्रदूषित हवेमुळे श्रीलंकन क्रिकेटपटूंनी तोंडाला मास्क लावून फिल्डिंग केली.
प्रदूषणामुळे रविवारी तीनवेळा खेळ थांबवावा लागला होता. श्रीलंकेचा कॅप्टन दिनेश चांदीमलने बॅटिंग करताना तोंडाला मास्क लावले नव्हते पण फिल्डिंगसाठी मैदानावर उतरल्यावर त्याने तोंडाला मास्क लावले होते. फक्त यष्टीरक्षक निरोशान डिकवेलाला प्रदूषणामुळे कुठला त्रास झाला नसल्याचे दिसत आहे. पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही डिकवेलाने तोंडाला मास्क लावले नव्हते. प्रदूषणाबाबत उपाय न योजल्याबद्दल नाराजी
दिल्लीमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, याबाबतचा सविस्तर आराखडा सादर न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित आयोगाने सोमवारी दिल्ली सरकारला फटकारले. इतके प्रदूषण व धुरके असताना, कोटला मैदानावर भारत-श्रीलंका कसोटी सामन्याला परवानगी का दिली, असा सवालही आयोगाने दिल्ली सरकारला केला. उपाययोजनेबाबतचा तुमचा आराखडा कुठे आहे? तो तुम्ही आतापर्यंत सादर का केला नाही? तुम्ही तुमची भूमिका रोज बदलत राहिलात तर आयोगाने करायचे तरी काय, असा सवाल करीत आयोगाचे अध्यक्ष व माजी सरन्यायाधीश स्वतंत्रकुमार यांनी ४८ तासांमध्ये आराखडा सादर करण्याचे आदेश दिल्ली सरकारला दिले. त्याआधी आराखडा सादर करण्यासाठी आम्हाला मुदतवाढ द्यावी, अशी विनंती दिल्ली सरकारचे मुख्य सचिव व पर्यावरण सचिव यांच्यातर्फे आयोगाला करण्यात आली.
हे सहन करीत राहायचे?दिल्लीतील धुरके व प्रदूषणाच्या रोजच्या रोज वर्तमानपत्रांत मोठ्या बातम्या येत आहेत, हवा अधिकाधिक वाईट होत आहे, खेळाडूंनाही तोंडाला मास्क लावण्याची वेळ आली आहे. असे असताना तुम्ही आतापर्यंत काही केले नाही, या शब्दांत नाराजी व्यक्त करीत, दिल्लीकरांनी हे सारे सहन करीतच राहावे, असे तुम्हाला वाटते की काय, असा सवालही हरित आयोगाने दिल्ली सरकारला केला.