मुंबई : भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. कारण एका मोठ्या प्रकरणात कपिल यांना बीसीसीआयने अजूनही क्लीन चीट दिलेली नाही. कपिल यांच्याबरोबर समितीमधील अन्य दोन सदस्यांनी बीसीसीआयने क्लीन चीट दिली आहे. पण कपिल यांना मात्र बीसीसीआयने दिलासा दिलेला नाही.
बीसीसीआयने भारताचे मुख्य प्रशिक्षक निवडण्यासाठी भारतीय सल्लागार समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये कपिल यांच्यासह भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगराजन यांची निवड करण्यात आली होती.
या सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची भारताच्या प्रशिक्षपदी निवड केली होती. शास्त्री यांच्या निवडीनंतर या सल्लागार समितीमधील सदस्याचे परस्पर हितसंबंध असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर बीसीसीआयने या तिघांचीही चौकशी केली होती. या चौकशीनंतर बीसीसीआयने आज यावर सुनावणी केली.
बीसीसीआयने या समितीबाबत आज निर्णय दिला. गायकवाड आणि रंगराजन यांना बीसीसीआयने दिलासा दिला आहे. पण कपिल यांच्याबाबतचा निकाल अजूनही राखून ठेवला आहे. देव यांच्याविरोधात अजून काही तक्रारी आहेत. त्या तक्रारी ऐकल्यानंतर आम्ही कपिल यांच्याबाबत निर्णय देणार आहोत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.