नवी दिल्ली - भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दखल बीसीसीआयनेही घेतली होती. बीसीसीआयने शामीला आपल्या करारातूनही वगळले होते. पण आता भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर बीसीसीआयने शामीला क्लीन चीट दिली आहे. त्याचबरोबर त्यावर करण्यात आलेले मॅच फिक्सिंगचे आरोपही फेटाळले. त्यामुळे शामीचे आयपीएलमध्ये खेळण्याचे दरवाजे उघडले आहेत. शामीने आयपीएलच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. मात्र आता शामीची पत्नी हसीन जहाँने शामाला आयपीएलमध्ये खेळू देऊ नका अशी मागणी केली आहे. काल रविवारी हसीन जहाँने दिल्ली डेअरडेव्हील संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत दुआ यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान हसीन जहाँने सात तारखेपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये शमीच्या खेळण्यावर प्रतिबंध करावा, अशी मागणी त्यांच्याकडे केली.
माध्यमांशी बोलताना हसीन जहाँने सांगितले, की घरगुती वाद जोपर्यंत मिटत नाहीत तोपर्यंत शामीला संघात ठेवू नये, अशी हेमंत दुआ यांच्याकडे मागणी केली आहे. यावर आता दिल्ली संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत दुआ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शामीने मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, शमीने मानसिक व त्रास दिल्याचा व त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा हसीनने आरोप केला होता. याप्रकरणी शमीवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यंदा आयपीएलच्या 11 व्या मोसमाची 7 एप्रिलला सुरुवात होणार आहे. शामी हा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळत आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी शामी प्रयत्नशील असून त्याने सराव करायला सुरुवात केली आहे.