लंडन : न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना गमविल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली याने विजेत्याचा निर्णय एका सामन्याद्वारे नव्हे तर ‘बेस्ट ऑफ थ्री’ आधारे व्हायला हवा,’ असे मत व्यक्त केले होते. कर्णधाराचा बचाव करीत अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने विराटने केवळ स्वत:चे मत मांडले होते, मात्र तशी मागणी केली नव्हती,’ असे शुक्रवारी स्पष्ट केले.
‘जगातील सर्वोत्कृष्ट संघाचा निर्णय केवळ एका सामन्याद्वारे नव्हे तर तीन सामन्यांच्या आधारे व्हायला हवा’, असे मत कोहलीने माध्यमांशी बोलताना व्यक्त केले होते. हाच संदर्भ देत अश्विन स्वत:च्या यूट्युब चॅनेलवर म्हणाला, ‘विराटने डब्ल्यूटीसी फायनल तीन सामन्यांची असावी अशी मागणी केल्याचे अनेकजण सांगत सुटले आहेत. हे हास्यास्पद म्हणावे लागेल. सामना संपल्यानंतर ॲंकर असलेला इंग्लंडचा माजी खेळाडू मायकेल आथरटन याने विराटला विचारले, ‘डब्ल्यूटीसीत काही वेगळे होऊ शकले असते का?’ यावर विराट म्हणाला,‘तीन सामने खेळविण्यात आले असते तर संघांसाठी परिस्थितीशी एकरूप होणे आणि मुसंडी मारणे शक्य झाले असते.’ विराटने कुठलीही मागणी मात्र केली नाही.’
डब्ल्यूटीसी फायनल खेळल्यानंतर भारतीय खेळाडू सुटीचा आनंद घेण्यासाठी बायोबबलमधून बाहेर पडले आहेत. याविषयी अश्विन म्हणाला, ‘विजयानंतर न्यूझीलंडने मध्यरात्रीपर्यंत जल्लोष केला. त्यांचा जल्लोष पाहणे कठीण झाले होते. आम्ही फायनल गमावल्यामुळे निराश होतो. न्यूझीलंडचे खेळाडू ट्रॉफीसह आनंद साजरा करीत होते. ते सामना खेळलेल्या खेळपट्टीवर गेले.’