नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात सकलेन मुश्ताक याला ‘दुसरा’चा जनक मानले जाते. मात्र, एका नव्या पुस्तकानुसार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी सर्वांत आधी या भेदक चेंडूचा उपयोग केल्याचा दावा केला आहे. शर्मा आॅफस्पिनर होते. दिल्लीकडून ते नऊ प्रथमश्रेणी सामने खेळले. अलीकडे ‘क्रिकेट विज्ञान’ नावाने प्रकाशित झालेल्या पुस्तकात शर्मा यांनी १९८० च्या दशकात दुसराचा प्रयोग केला होता, असा दावा करण्यात आला आहे. १९८७ साली त्यांनी पाकचा फलंदाज एजाज अहमद याला अशाच चेंडूवर बाद केले होते. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार धर्मेंद्र पंत यांनी लिहिलेले हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केले आहे.पुस्तकानुसार ‘दुसरा’चे नाव येताच सकलेनला या शैलीचे जनक मानले जाते; पण त्याआधीच दिल्लीचा फिरकीपटू राजकुमार शर्मा यांनी असा चेंडू विकसित केला होता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने देखील शर्मा यांच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले होते.बायोमेकॅनिकल तज्ज्ञ डॉ. रेन फर्नांडिस यांनी ‘दुसरा’ चेंडू टाकताना राजकुमार यांची शैली शंभर टक्के योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. राजकुमार यांनी हा चेंडू विकसित केला; पण पाकचा यष्टिरक्षक मोईन खान याने ‘दुसरा’ असे नाव दिले. सकलेन गोलंदाजी करायचा त्यावेळी यष्टिमागे असलेला मोईन ओरडायचा... ‘सकलेन, दुसरा फेक.. दुसरा..!’याच पुस्तकात गुगलीच्या शोधाबद्दल माहिती देण्यात आली आहे. कसोटी क्रिकेटच्या जन्मानंतर २० वर्षांनी १८९७ मध्ये इंग्लंडचा अष्टपैलू बर्नार्ड बोसेनबेट याने बिलियर्डसच्या टेबलवर एक खेळ खेळताना रहस्यमयी गुगलीचा शोध लावला. सोबतच अनेकांना बुचकळ्यात टाकणारा ‘कॅरमबॉल’ श्रीलंकेचा फिरकीपटू अजंता मेंडिस याने नव्हे, तर दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या एका सैनिकाचा अविष्कार असल्याचा पुस्तकात दावा केला आहे. चेंडूच्या स्विंग होण्याच्या वैज्ञानिक पद्धतीवरदेखील सखोल प्रकाश टाकण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)‘दुसरा’ म्हणजे काय...‘दुसरा’ हा आॅफस्पिनरद्वारा करण्यात येत असलेल्या विशिष्ट गोलंदाजी शैलीचा प्रकार आहे.‘आॅफ ब्रेक’ गोलंदाजीचा अगदी उलट दुसरा चेंडू टाकला जातो. यामागे फलंदाजाला द्विधा मन:स्थितीत आणून त्याला चुकीचा फटका मारण्यास भाग पाडणे हा हेतू असतो.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कोहलीच्या कोचने लावला ‘दुसरा’चा शोध
कोहलीच्या कोचने लावला ‘दुसरा’चा शोध
क्रिकेट विश्वात सकलेन मुश्ताक याला ‘दुसरा’चा जनक मानले जाते. मात्र, एका नव्या पुस्तकानुसार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी सर्वांत आधी या भेदक चेंडूचा उपयोग केल्याचा दावा केला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 2:52 AM