कोलकाता - उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. भारतासह जगातील कोणत्याही मैदानावर खोऱ्यानं धावा खेचणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला कोलकाता मैदानात आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आलेली नाही. कसोटीमध्ये विराटसाठी इडन गार्डन्सहे अनलकीच राहिल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होतय. विराट कोहलीनं इडन गार्डन्सवर आतापर्यंत तीन कसोटी सामन्यातील सहा डावात फक्त 83 धावांच करता आल्या आहेत. यावेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या 45 आहे. भारतीय रनमशीन विराट कोहलीनं वन-डे सामन्यात इथ धावांचा पाऊस पाडला आहे. वनडेमध्ये विराटनं इडन गार्डन्सवर 54 च्या सरासरीनं धावा काढल्या आहेत. पण कसोटी सामन्यात त्याला लौकीकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे श्रीलंकेविरोधात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात धावांची सरबत्ती करुन अनलकी टॅग काढण्याचा प्रयत्न करेल.
कोलकाताच्या मैदानावरील भारतीय संघाच्या विक्रमावर नजर टाकल्यास भारताला हे मैदान लकी असल्याचे पहायला मिळते. या मैदानावर भारतानं खेळेलेल्या 40 सामन्यातील 12 मध्ये विजय तर 9 मध्ये पराभव स्विकारला आहे. तर 19 सामने अनिर्णित राहिलं आहेत. भारतासाठी एक आनंदाची बाब म्हणजे, श्रीलंकाला भारतात आतापर्यंत एकही कसोटी विजय मिळवता आलेला नाही. लंकेनं 1982 मध्ये सर्वात प्रथम भारत दौरा केला होता. तेव्हापासून त्यांना आतापर्यंत एकही विजय मिळता आला नाही. त्यामुळे लंकेच्या संघावर मानसिक दबाव असणार यात कोणतीही शंका नाही. घरच्या मैदानावर लंकेविराधात भारतानं आतापर्यंत 17 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये दहा सामन्यात विजय मिळवला आहे. तर सात सामने अनिर्णित राहिलेत.
दरम्यान, आज सकाळी कोलकातामध्ये पावसानं हजेरी लावली , त्यामुळे सकाळच्या सत्रात विराटसेनाला सराव करता आला नाही. हवामान खात्यानं शनिवारपर्यंत कोलकातामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कोलकाता कसोटीत पहिले तीन दिवस किती खेळ होईल यावर शंका निर्माण केली जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौ-यावर जाणार आहे. या दौ-यात भारतीय संघ तीन कसोटी, सहा वन-डे व तीन टी-२० सामने खेळणार आहे.