कोलकाता : भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिन हा सध्या वडोदरा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी संघर्ष करत आहे. 28 डिसेंबरला झालेल्या रस्ता अपघातात त्याच्या फुप्फुस आणि यकृताला गंभीर दुखापत झाली आहे. मार्टिनच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची विनंती केल्यानंतर अनेक क्रिकेटपटू पुढे आले आणि मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यामध्ये पांड्या बधुंपैकी कृणालनेही पुढाकार घेतला आहे. हार्दिक पांड्या सध्या चुकीच्या कारणामुळे चर्चेत असला तरी कृणालने सर्वांची मनं जिंकली आहेत.
माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही मार्टिनला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आश्वासन त्याने मार्टिन कुटुंबीयांना दिले आहे. बडोदाला रणजी करंडक जिंकून देणारा मार्टिनच्या उपचाराच्या खर्चासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 5 लाख आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनने 3 लाखांची मदत जाहीर केली आहे. इरफान पठाण, युसूफ पठाण, झहीर खान, आशिष नेहरा या क्रिकेटपटूंनीही त्यांना आर्थिक सहकार्य केले.
क्रिकेटपटूंच्या या यादित मुंबई इंडियन्सच्या कृणाल पांड्याचाही समावेश झाला आहे. मार्टिनने 10 वन डे सामन्यांत 22.57च्या सरासरीने 158 धावा केल्या आहेत. त्याने पाच सामने हे गांगुलीच्या आणि अन्य पाच सामने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळले. 138 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने 9192 धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली बडोदाने 2000-2001 मध्ये पहिल्यांदा रणजी करंडक उंचावला.
कृणालने मार्टिन यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून ब्लँक चेक दिला आहे. त्याने BCCI चे माजी सचिव संजय पटेल यांच्यामार्फत हा चेक मदत म्हणून पाठवला आहे. '' मार्टिन यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम चेकवर लिहा, मात्र लाख रुपयांपेक्षा कमी नसावी’, असे कृणालने सांगितल्याची माहिती संजय पटेल यांनी दिली.