मुंबई: भारतीय क्रिकेट संघानं इंग्लंड दौऱ्याची शानदार सुरुवात केली आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय शिलेदारांनी सहज जिंकला आहे. फिरकीपटू कुलदीप यादवनं इंग्लिश फलंदाजांना धक्के दिल्यावर के. एल. राहुलनं नाबाद शतक साजरं केलं. त्यामुळे भारतानं इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. त्यामुळे आता या मालिकेत भारताकडे 1-0 अशी आघाडी आहे. मॅचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात रंगलेल्या सामन्यात कुलदीप यादव आणि महेंद्रसिंह धोनीची जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळाली. या दोघांच्याही नावावर काल विश्वविक्रमाची नोंद झाली. यष्टींमागे कायम चपळाई दाखवणारा महेंद्रसिंह धोनी आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा कुलदीप यादव या दोघांनी 14 व्या षटकात कमाल केली. यामुळे इंग्लंडच्या फलंदाजीला ब्रेक लागला. कुलदीप यादवनं 14 व्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूंवर अनुक्रमे जॉनी बेअरस्टो आणि जो रुटला बाद केलं. या दोन्ही फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही. विशेष म्हणजे या दोघांनाही धोनीनं चपळाईनं यष्टिचीत केलं. टी-20 क्रिकेटमध्ये दोन फलंदाजांना लागोपाठच्या चेंडूंवर शून्यावर यष्टिचीत करण्याची किमया आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला जमली नव्हती. ही कामगिरी कुलदीप यादवनं करुन दाखवली. कुलदीप यादव इंग्लिश फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवत असताना धोनीनं यष्टींमागे उरलेली जबाबदारी पार पाडली. यामुळे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजांना यष्टिचीत करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर जमा झाला आहे. धोनीनं टी-20 क्रिकेटमध्ये 33 फलंदाजांना यष्टिचीत केलं आहे. त्यानं पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमलला (32) मागे टाकलं आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- धोनी आणि कुलदीपची जुगलबंदी; आता 'हे' दोन विक्रम भारताच्या नावावर
धोनी आणि कुलदीपची जुगलबंदी; आता 'हे' दोन विक्रम भारताच्या नावावर
कुलदीपच्या भेदक गोलंदाजीला धोनीच्या चपळ यष्टीरक्षणाची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 9:06 AM