ढाकाः श्रीलंका संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात बांगलादेशला नमवून तीन वन डे सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. पण, या सामन्यानंतर श्रीलंकेचा मधल्या फळीचा फलंदाज कुसल मेंडिसला लाजीरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागला. सामन्यानंतरच्या सोहळ्यात मेंडिस बाईक चालवत होता. त्यावेळी त्याची बाईक घसरली आणि त्याला उचलण्यासाठी सुरक्षारक्षकांनी धाव घेतली.
श्रीलंकेने अखेरच्या वन डे सामन्यात यजमान बांगलादेशवर 122 धावांनी विजय मिळवला. 294 धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा संपूर्ण डाव 36 षटकांत 172 धावांत गडगडला. या सामन्यात मेंडिसने 58 चेंडूंत 54 धावा केल्या. या सामन्यात 87 धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. मॅथ्यूजला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले. त्यानं या मालिकेत या 87 धावांव्यतिरिक्त 48 व नाबाद 52 धावाही केल्या. मेंडिसनेही या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत 43 व नाबाद 41 धावांची खेळी केली.
हा सामना श्रीलंकन संघाने नुवान कुलसेकराला समर्पित केला. नुवानने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तो या सामन्यात प्रेक्षक म्हणून उपस्थित होता, परंतु लंकंन खेळाडूंनी माजी गोलंदाजाला गार्ड ऑफ ऑनर दिला.
पाहा व्हिडीओ