श्रीलंकेचा दिग्गज अन् आपल्या वेगवान गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना चीतपट करणारा लसिथ मलिंगा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसणार आहे. खरं तर मलिंगा आयपीएल २०२४ मध्ये मुंबईच्या शिलेदारांना गोलंदाजीचे धडे देईल. तो शेन बाँडच्या जागी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज आहे. मागील नऊ हंगाम मुंबईच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करणारे बॉंड मावळते प्रशिक्षक असणार असल्याचे कळते.
Espncricinfoने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी आयपीएल हंगामात लसिथ मलिंगा मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. २०२१ मध्ये निवृत्त झाल्यानंतर लसिथ मलिंगा राजस्थान रॉयल्सच्या संघाचा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. या पदावर त्याने दोन हंगाम काम केले. एकंदरीत मलिंगाने मुंबई इंडियन्ससोबत असताना पाच विजेतेपदे जिंकली. चार आयपीएल (२०१३, २०१५, २०१७, २०१९) आणि २०११ मध्ये चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२०. मलिंगाने मुंबईसाठी एकूण १३९ सामने खेळले असून ७.१२ च्या सरासरीने १९५ बळी घेतले आहेत.
मलिंगा नव्या भूमिकेत... शेन बॉंड यांनी २०१५ पासून मुंबईच्या गोलंदाजांना मार्गदर्शन केले. ते नऊ वर्षांपूर्वी मुंबईच्या ताफ्यात रुजू झाले होते आणि रोहित शर्मा आणि महेला जयवर्धने यांच्यासोबत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. बॉंड यांनी २०१७ पासून मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. लसिथ मलिंगाने २०२० मध्ये आयपीएलसह फ्रँचायझी क्रिकेटला रामराम केले. १२२ सामन्यांमध्ये १७० बळी घेतल्यानंतर मलिंगाने आपला आयपीएलचा प्रवास थांबवला.
लखनौच्याही ताफ्यात फेरबदलभारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि आयपीएल विजेता कर्णधार गौतम गंभीर याने आयपीएल २०२४ पूर्वी लखनौ सुपरजायंट्सची साथ सोडण्याची तयारी सुरू केली आहे. गौतम गंभीर हा LSGचा मार्गदर्शक आहे, परंतु मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यानंतर आता तोही LSGची साथ सोडणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. अलीकडेच आयपीएल फ्रँचायझीने त्यांच्या धोरणात्मक सल्लागारपदी BCCIचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांची निवड जाहीर केली होती. याच प्रसाद यांच्यासोबत गंभीरचे अंबाती रायुडूला न निवडण्यावरून शाब्दिक भांडण झाले होते.