IPL 2022 चे पडघम आता वाजू लागले आहेत. स्पर्धा आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच संघ आपल्या खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यासाठी नेट्स आणि सराव सत्रात घाम गाळत आहेत. यंदाच्या मुंबईच्या नेट्समध्ये दोन मोठे बदल दिसून येत आहेत. ते बदल म्हणजे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अनुभवी 'यॉर्कर किंग' लसिथ मलिंगाची अनुपस्थिती. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे हे दोनही खेळाडू मुंबईच्या कॅम्पमधून बाहेर गेले असले तरी दुसऱ्या संघात एकत्र आहेत. तो संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स. IPL च्या सुरूवातीपासून मुंबईकडून खेळणारा लसिथ मलिंगा यंदाच्या वर्षी राजस्थानचा वेगवान गोलंदाजी कोच म्हणून ताफ्यात दाखल झाला आहे. या निर्णयानंतर, मुंबईचा संघ नाखुश असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यात फारसं तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता, खुद्द लसिथ मलिंगाने आपल्या या नव्या भूमिकेबाबत भावना व्यक्त केल्या.
१३ वर्षे मुंबई इंडियन्सच्या संघाबरोबर घालवल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या संघासोबत जॉईन व्हावंसं का वाटलं? असा सवाल मलिंगाला करण्यात आला. त्यावर त्याने अतिशय समतोल उत्तर दिलं. "गेल्या वर्षीच मला राजस्थानच्या वतीने कुमार संगाकाराने या पदासाठी विचारलं होतं. पण कोविडची बंधने आणि बायोबबल मध्ये राहणं या साऱ्या गोष्टी मला फारशा झेपत नव्हत्या. कारण मला माझ्या कुटुंबासोबत राहायचं होतं. पण यंदा मी श्रीलंकेच्या संघासाठी ही भूमिका पार पाडली आणि मला असं वाटलं की मी आता या भूमिकेला न्याय देण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे मी संगाकाराच्या विनंतीला मान देत राजस्थान संघासोबत जॉईन झालो", असं मलिंगाने स्पष्ट केलं.
राजस्थान रॉयल्सकडून या पदासाठी विचारणा झाली तेव्हा पहिला विचार काय होता? त्यावर मलिंगा म्हणाला, "सर्वात आधी माझ्या डोक्यात आला तो म्हणजे या संघाचा रंग.. गुलाबी! दुसरी गोष्ट मी इतके वर्ष या संघाविरूद्ध खेळलो आहे. या संघात नेहमीच प्रतिभावान आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक खेळाडूंचा भरणा असतो. मी त्याचा पुरेपूर अनुभव घेत आहे. हा संघ कायमच स्पर्धा करण्यास उत्सुक असतो. त्यामुळे जर एखादा दिवस हा राजस्थानचा असेल तर त्यादिवशी कोणत्याही संघाची या संघासमोर धडगत नसते."
"खेळाडूंना प्रशिक्षक देणं हे माझ्यासाठी थोडंसं नवीन असणार आहे. माझ्या अनुभवाचा उपयोग करून नवीन पिढी घडणवण्याची मला संधी मिळाली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघासाठी ही भूमिका मी याआधी बजावली आहे. आता राजस्थान रॉयल्स संघासाठी पुन्हा एकदा या भूमिकेत असण्याचा मला आनंदच आहे. राजस्थानच्या संघाचा कॅम्प आणि त्यांची संस्कृती हे माझ्यासाठी नवीन आहे. पण असं असलं तरी प्रतिभावान अशा गोलंदाजांना प्रशिक्षण देताना मला मजा येतेय. मी माझं काम खूप एन्जॉय करतोय", असं लसिथ मलिंगा म्हणाला.