हॅमिल्टन : भारतीय महिला संघ यजमान न्यूझीलंडविरुद्ध रविवारी तिसरा व अखेरचा टी२० सामना खेळणार असून, विजयासह प्रतिष्ठा कायम राखण्याचे आव्हान भारतापुढे असेल. याआधी न्यूझीलंडने तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्याने हा सामना केवळ औपचारिकता असेल. मात्र, क्लीनस्वीप टाळण्यासाठी भारतीयांना सर्वोत्तम खेळ करावा लागेल.भारताला फलंदाजीत बरीच सुधारणा करण्याची गरज आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ ने खिशात घालणारा भारत टी२० मालिकेत मात्र अपयशी ठरला. आयसीसी टी२० विश्वचषकासाठी संघ बांधणीचा भाग म्हणून अनुभवी मिताली राज हिला दोन्ही सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले होते. पण मितालीच्या अनुपस्थितीत भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले. स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरणे हेही पराभवाचे मोठे कारण होते. हरमनप्रीतने स्वत: क्रमश: १७ आणि ५ धावा केल्या. गोलंदाजीत दीप्ती शर्मा, राधा यादव आणि पूनम यादव यांचा माराही प्रभावी ठरू शकला नव्हता. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघभारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्त, डायलान हेमलता, मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, प्रिया पुनिया.न्यूझीलंड : एमी सॅटर्थवेट (कर्णधार), सूजी बेट्स, बर्नाडाईन बी, सोफी डिव्हाईन, हिली जेन्सन, कॅटलिन गुरी, ले कास्पेरेक, एमेलिया केर, फ्रान्सिस मॅके, केटे मार्टिन, रोझमरी मायर, हन्ना रोव, लिया ताहूहू.