बर्लिन: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतल्यानंतरही एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रीडा क्षेत्रात मानाचा म्हणून ओळखला जाणारा लॉरियस स्पोर्टींग मोमेंट 2000- 2020 हा पुरस्कार सचिन तेंडुलकरने पटकावला आहे. जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहरात आयोजित करण्यात आलेल्या लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्समध्ये सचिनचे नाव जाहीर करण्यात आले.
सचिन तेंडुलकरसह जगभरातील 20 दावेदारांना या पुरस्कारासाठी नामांकन होतं. मात्र पुन्हा एकजा सर्वांना मागे टाकत सचिनने हा बहुमान आपल्या नावे केला आहे. टीम इंडियाच्या 2011 सालच्या विश्वचषक विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये सचिनला त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्या खांद्यांवर उचलून घेतलं होतं. तोच क्षण लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्समध्ये गेल्या 20 वर्षांमधला सर्वोच्च क्षण ठरला आहे.
सचिन तेंडुलकरने कारकिर्दीत 6 विश्वचषक खेळले. त्यापैकी सहावा म्हणजे 2011 सालच्या विश्वचषक भारताने बाजी मारली होती. तसेच लॉरियसचा 'स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार' फॉर्म्युला वन रेसर लुईस हॅमिल्टन आणि फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांना जाहीर करण्यात आला आहे.