नवी दिल्ली इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) सर्वांत यशस्वी लेग स्पिनर अमित मिश्राच्या मते मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणे कठीण कला असून, त्यासाठी सरावासोबत सामन्याच्या खडतर क्षणी कर्णधाराची साथ मिळणे आवश्यक असते.भारतीय क्रिकेटमध्ये बोटाच्या जोरावर गोलंदाजी करणाऱ्या फिरकीपटूंच्या स्थानी मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणाऱ्या फिरकीपटूंना प्राधान्य देण्यात आले आहे; पण चार वर्षांनंतर संघ पुन्हा एका बोटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणाऱ्या फिरकीपटूंकडे बघत आहे. मिश्राच्या मते चांगल्या लेग स्पिनरला विकसित करण्यासाठी चांगल्या कर्णधाराची गरज असते.मिश्रा म्हणाला, ‘कुठल्याही लेग स्पिनरला एका चांगल्या कर्णधाराची गरज असते. ज्यावेळी गोलंदाजाविरुद्ध धावा फटकावल्या जातात त्यावेळी त्याचा आत्मविश्वास उंचावणाऱ्या कर्णधाराची गरज असते.’ मिश्रा म्हणाला, ‘माझा बोलण्याचा अर्थ अशा कर्णधाराबाबत आहे तो लेग स्पिनरची मानसिकता समजू शकतो.’मिश्राने भारतातर्फे सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये ६८ सामने खेळले आहेत. युजवेंद्र चहल, कुलदीप यादव व राहुल चाहर यांचा अपवाद वगळता सध्या भारतीय क्रिकेटमध्ये कुणी चांगला लेग स्पिनर नाही.
मिश्रा म्हणाला, ‘गेल्या पाच-सहा वर्षांत आमच्याकडे काही चांगले लेग स्पिनर आहे; पण ज्यावेळी आपल्याकडे असे गोलंदाज असतील त्यावेळी जास्त गुणवत्ता मिळेल. ज्यांच्याकडे कौशल्य असेल आणि ते आपली कला पुढील पिढीला देतील . लेग स्पिनबाबतची कला पुढील पिढीला सांगणे आवश्यक आहे. कारण ही एका कलेप्रमाणे आहे. मिश्रा भारतातर्फे २०१७मध्ये अखेरचा सामना खेळला होता. तो २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपल्या गेल्या वन-डे मालिकेत १५ बळीसह मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. त्यानंतर त्याला केवळ दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत संधी मिळाली आणि नंतर बाहेर करण्यात आले. मिश्राला ज्यावेळी विचारण्यात आले की, तू संथ गोलंदाजी करीत होता का? याबाबत बोलताना तो म्हणाला, ‘मी लोकांना त्यांचे निष्कर्ष काढण्यापासून थांबवू शकत नाही. मी गेल्या १३ वर्षांपासून जगातील सर्वांत खडतर टी-२० लीगमध्ये खेळत आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे, असेही त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)गोलंदाजांनाही स्वत:ला विकसित करण्याची गरज मिश्राने आयपीएलच्या १५० सामन्यांत १६० बळी घेतले आहेत. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मलिंगानंतर दुसऱ्या स्थानी आहे. हा अनुभवी गोलंदाज म्हणाला, ‘आपल्याकडे चांगले फिरकीपटू नाहीत, असे मी म्हणत नाही. आपल्याकडे अनेक गोलंदाज आहेत; पण त्यातील अनेकांना मार्गदर्शनाची गरज आहे. मार्गदर्शन मिळाले तर तुम्हाला मोठ्या संख्येने असे गोलंदाज दिसतील.’ मिश्रा म्हणाला की, फलंदाजांनी नवे फटके विकसित केले आहे. विशेषत: टी-२० क्रिकेट गोलंदाजांसाठी अधिक आव्हानात्मक झाले आहे. आयपीएलमध्ये कारण फलंदाज नेहमी तुमच्याविरुद्ध आक्रमण करण्यास सज्ज असतो. गेल्या काही वर्षांत टी-२०च्या स्ट्रोक प्लेमध्ये (फलंदाजांचे फटके) किती बदल झाले आहेत. त्याचप्रमाणे गोलंदाजांनाही स्वत:ला विकसित करण्याची गरज आहे.’