सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याला सामोरे जाण्याआधीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. महत्त्वाचा फलंदाज आणि यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो मालिकेला मुकणार आहे.
शनिवारी नेट्समध्ये सराव करत असताना त्याला दुखापत झाली होती. सध्याच्या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात राहुल खेळू शकला नव्हता. चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होणार आहे.
राहुल मंगळवारी भारताकडे रवाना झाला. बेंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपस्थित राहणार असल्याचेही बीसीसीआयने सांगितले. याआधी मोहम्मद शमी आणि उमेश यादव दुखापतीमुळे संघाबाहेर पडले. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघात ईशांत शर्मादेखील सहभागी होऊ शकला नाही. ३६ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या राहुलला विराटच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत संधी मिळण्याची शक्यता होती, मात्र पहिल्या दोन्ही सामन्यात तो बाहेर बसला. या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्ध ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या स्थानिक वन डे मालिकेला मुकण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
राहुल बाहेर झाल्याने हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल. हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत. दुसरीकडे, स्टार फलंदाज रोहित शर्माने डावाची सुरुवात केल्यास मात्र मयांक अग्रवालला संघाबाहेर बसावे लागू शकते. याशिवाय रोहित- मयांक सलामीला आल्यास शुभमान गिल याला मधल्या फळीत खेळविण्याचा अन्य पर्यायदेखील भारतीय संघ व्यवस्थापनेकडे उपलब्ध आहे. रोहित कोणत्या स्थानी फलंदाजी करणार, यावर मयांक आणि हनुमा यांचे अंतिम संघातील स्थान निश्चित होईल. रोहित सलामीला खेळणार असेल, तर मयांकला बाहेर जावे लागेल. त्याचप्रमाणे, जर रोहितला मधल्या फळीत खेळविण्याचा निर्णय झाला, तर अशा परिस्थितीत हनुमा संघाबाहेर बसेल.
बीसीसीआयने निवेदन प्रसिद्ध करीत राहुलच्या दुखापतीसंबंधी माहिती दिली. ‘शनिवारी मेलबोर्न क्रिकेट मैदानावर सराव करत असताना राहुलच्या मनगटाला दुखापत झाली आहे. दुखापत पूर्ण बरी होण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागणार असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नसेल,’ असे म्हटले आहे.