लंडन : पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत भारताने इंग्लंडवर सहज विजय मिळवला. या लढतीत फिरकीपटू कुलदीप यादवने पाच बळी मिळवले, तर लोकेश राहुलने शतक झळकावले. त्यामुळे हे दोघे चर्चेचा विषय ठरत आहेत. पण या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने एक विक्रम रचला आहे. धोनीने नेमका कोणता विक्रम रचला, हे तुम्हाला माहिती आहे का...
कुलदीपने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना यावेळी तंबूचा रस्ता दाखवला. कुलदीपच्या या पाच विकेट्समध्ये धोनीचाही महत्त्वाचा वाटा होता. कारण धोनीने कुलदीपच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या दोन फलंदाजांना यष्टीचीत केले.
धोनीने कुलदीपच्या तेराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोला यष्टीचीत केले, त्यानंतरच्याच चेंडूवर धोनीने जो रुटला यष्टीचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. या दोन बळींसह धोनीने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आता धोनी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजांना यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक ठरला आहे. हा विक्रम यापूर्वी पाकिस्तानच्या कामरान अकमलच्या नावावर होता, त्याने ३२ फलंदाजांना यष्टीचीत केले होते. धोनीने या सामन्यात दोन बळी मिळवत एकूण ३३ फलंदाजांना यष्टीचीत केले. त्यामुळे आता अजून एक विक्रम धोनीच्या नावावर जमा झाला आहे.