मानधना, रॉड्रिग्जचा झंझावात, न्यूझीलंडवर भारताची ९ गड्यांनी मात

सांगलीच्या स्मृती मानधनाचे शतक व मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद ८१ धावांच्या बळावर भारतीय महिला संघाने न्यूझीलंडचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात गुरुवारी नऊ गड्यांनी सहज पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 06:17 AM2019-01-25T06:17:23+5:302019-01-25T06:17:41+5:30

whatsapp join usJoin us
Manshana, Rodriguez storm, India beat New Zealand by nine wickets | मानधना, रॉड्रिग्जचा झंझावात, न्यूझीलंडवर भारताची ९ गड्यांनी मात

मानधना, रॉड्रिग्जचा झंझावात, न्यूझीलंडवर भारताची ९ गड्यांनी मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नेपियर : सांगलीच्या स्मृती मानधनाचे शतक व मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद ८१ धावांच्या बळावर भारतीय महिला संघाने न्यूझीलंडचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात गुरुवारी नऊ गड्यांनी सहज पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
२२ वर्षांच्या मानधनाने १०५ आणि १८ वर्षांच्या रॉड्रिग्जने नाबाद ८१ धावांची झंझावाती खेळी केली. त्याआधी भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाला १९२ धावांत गुंडाळले. टी-२० विश्वचषक स्पर्धेचा उपांत्य सामना गमविल्यापासून भारताची ही पहिलीच मालिका आहे. हा सामना ३३ षटकांतच भारताने जिंकला. ‘आयसीसी’चा सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा मान पटकावणाऱ्या मानधनाचे हे चौथे एकदिवसीय शतक ठरले.
रॉड्रिग्जचे देखील हे पहिलेच आंतरराष्टÑीय अर्धशतक होते. मानधनाने १०४ चेंडूंचा सामना करीत नऊ चौकार आणि तीन षट्कारांची आतषबाजी केली. रॉड्रिग्जने नऊ चौकार मारले.
न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती; पण नंतर फलंदाजांना धावगती कायम राखण्यात अपयश आले. एकता बिश्त आणि पूनम यादव यांनी भेदक मारा करून न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. सलामीच्या सुझी बेट्सने सर्वाधिक ३८ आणि सोफी डिव्हाईनने २८ धावा केल्या. इतर फलंदाजांची त्यांना साथ मिळाली नाही. एकता आणि पूनमचा अपवाद वगळता दीप्ती शर्मा आणि शिखा पांडे यांनी क्रमश: दोन आणि एक गडी बाद केला.
भारताने आक्रमक सुरुवात केली. मुंबईची जेमिमा रॉड्रिग्ज आणि सांगलीची स्मृती यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत सलामीला तब्बल १९० धावांची भागीदारी केली. विजयासाठी तीन धावांची गरज असताना स्मृती बाद झाली. विजयाची औपचारिकता रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांनी पूर्ण केली. दुसरा सामना
२९ जानेवारीला माऊंट माऊंगानुई येथे खेळला जाईल. (वृत्तसंस्था)
स्मृतीचा पराक्रम
आयसीसीच्या २०१८ सालचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणाºया स्मृतीचे हे कारकिर्दीतील चौथे शतक आहे. या शतकाबरोबर तिने आतापर्यंत एकाही भारतीय महिला फलंदाजाला न जमलेला विक्रम करून दाखविला.
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलिया येथे एकदिवसीय सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम तिने केला. आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंमध्ये अशी कामगिरी करणारी स्मृती दुसरी खेळाडू ठरली. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या क्लेर टेलरच्या नावावर होता. जेमिमा व स्मृती यांनी पहिल्या विकेटसाठी
१९० धावांची भागीदारी करताना विक्रम केला. २००३ नंतर भारताच्या पहिल्या विकेटने नोंदवलेली ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. २००३ मध्ये अंजू जैन आणि जया शर्मा यांनी १४४ धावांची भागीदारी केली होती. जेमिमा आणि स्मृती या जोडीने तोही विक्रम मोडला.
>मितालीचा विश्वविक्रम
मिताली राजने या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी न करताच एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात मितालीने सर्र्वांत जास्त काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. मितालीला आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये १९ वर्षे आणि २१२ दिवस झाले आहेत. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या क्लेयर शिलिंगटनच्या नावावर होता. ती १९ वर्षे १९५ दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळली आहे.
>ही शानदार सुरुवात आहे. सलामीच्या जोडीला शतकी भागीदारी करताना पाहणे सुखावह होते. मानधना मुलींसाठी ‘रोल मॉडेल’ आहे. तिने मागच्यावर्षी शानदार कामगिरी केली. शिवाय लय कायम राखली. यामुळे सहकाºयांमध्ये आत्मविश्वास संचारला आहे.
- मिताली राज, कर्णधार.
>धावफलक
न्यूझीलंड : सुजी बेट्स झे. गोस्वामी गो. शर्मा ३६, सोफी डिवाईन धावचित शर्मा २८, लॉरेन डाउन यष्टिचित यादव गो. यादव ०, एमी सॅटर्थवेईट झे. रॉड्रिग्ज गो. यादव ३१, अ‍ॅमेलीया केर झे. हेमलथा गो. यादव २८, मॅडी ग्रीन त्रि. गो. बिश्त १०, बर्नाडीन बेझुईडेनहौ यष्टिचित भाटिया गो. शर्मा ९, लेघ कस्पेरेक झे. भाटीया गो. बिश्त ६, हन्ना रोवे झे. पांडे, गो. बिश्त २५, होली हडलस्टन झे. कौर गो. पांडे १०, ली ताहुहु नाबाद ४ एकूण : ४८.४ षटकांत सर्वबाद १९२.
गडी बाद क्रम : १/६१, २/६८, ३/७०, ४/११९, ५/१३६, ६/१४०, ७/१४८, ८/१६१, ९/१८७, १०/१९२.
गोलंदाजी : गोस्वामी १०-०-४१-०, पांडे ७.४-१-३८-१, बिश्त ९-०-३२-३, शर्मा १०-१-२७-२, यादव १०-०-४२-३, हेमालाथा २-०-१२-०.
भारत : जेमिना रॉड्रिग्ज नाबाद ८१, स्मृती मानधना झे. ताहुहू गो केर १0५, दिप्ती शर्मा नाबाद ०, एकूण : ३३ षटकांत १ बाद १९३. गडी बाद क्रम : १/१९०,
गोलंदाजी : ताहुहु ५-०-३४-०, रोवे ५-०-२९-०, हडलस्टन ३-०-२२-०, कस्पेरेक ७-०-३७-०, केर ६-०-३३-१, डिवाईन ३-०-१४-०, सॅटर्थवेईट ४-०-२२-०.

Web Title: Manshana, Rodriguez storm, India beat New Zealand by nine wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.