ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार अॅरोन फिंचने मंगळवारी 50 षटकांच्या सामन्यात तुफान हाणामारी केली. पण, त्याचे द्विशतक अवघ्या काही धावांनी हुकले. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मार्श चषक वन डे स्पर्धेत व्हिक्टोरिया संघाचे प्रतिनिधित्व करताना फिंचने ही फटकेबाजी केली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर व्हिक्टोरिया संघाने क्विन्सलँडने विजयासाठी ठेवलेले 305 धावांचे लक्ष्य 44.2 षटकांत अवघ्या एका विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. फिंचची ही खेळी ऑस्ट्रेलियातील स्थानिक वन डे सामन्यातील पाचवी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.
क्विन्सलँडने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 304 धावा केल्या. उस्मान ख्वाजानं 125 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून 112 धावांची खेळी केली. त्याला सॅम हीझलेट ( 69) आणि मॅट रेनशॉ ( 66) वगळता अन्य कुणाचीही साथ लाभली नाही. प्रत्युत्तरात फिंच व सॅम हार्पर यांनी 136 धावांची सलामी देत व्हिक्टोरियाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. हार्पर ( 44) बाद झाल्यानंतर मार्कस हॅरिसने खिंड लढवली. फिंचने 151 चेंडूंत 11 चौकार व 14 षटकार खेचून नाबाद 188 धावांची खेळी केली. हॅरिसने 75 चेंडूंत 5 चौकारांसह नाबाद 61 धावा केल्या.