बंगळुरू : वन डे विश्वचषकात पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका बसला आहे. मॅट हेनरी दुखापतीमुळे उर्वरित विश्वचषकाला मुकणार असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली. शनिवारी बंगळुरू येथे होणारा न्यूझीलंड विरूद्ध पाकिस्तान हा सामना दोन्हीही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेजाऱ्यांसाठी तर उद्याची लढत 'करा किंवा मरा' अशी असेल. बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाल्याने मॅट हेनरी विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर झाला. हेनरीला दुखापतीतून सावरण्यासाठी कमीत कमी २ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे त्याच्या जागी काइल जेमिसनला संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टडी यांनी सांगितले की, मॅट मोठ्या कालावधीपासून वन डे संघाचा हिस्सा राहिला आहे. मागील काही वर्षांपासून आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या १० गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे, ज्यावरून त्याची प्रतिभा दिसते. जेमिसन मागील गुरूवारी बंगळुरूत दाखल झाला आहे, जिथे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे.
पाकिस्तानसाठी 'करा किंवा मरा'न्यूझीलंडविरूद्धचा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पाकिस्तानी संघाला चालू विश्वचषकात केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत शेजाऱ्यांना विजय मिळवणे आवश्यक आहे.