मुंबई इंडियन्सनेहार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) कर्णधार केल्यानंतर चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या आतापर्यंतच्या सामन्यांत चाहत्यांकडून टीका होताना दिसली. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हार्दिकच्या नावाने चाहत्यांनी शिमगा केला. असाच प्रकार मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावरही पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन ( MCA) अशा चाहत्यांवर कारवाई करण्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर आता MCA ने त्यांची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने या सर्व अफवा असल्याचे जाहीर केले आहे. हार्दिक पांड्याला टार्गेट करणाऱ्या प्रेक्षकांना रोखण्यासाठी MCA अतिरिक्त पोलीस उभे करणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे MCA ने सांगितले. १ एप्रिलला मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. ''हार्दिकला नापसंती दर्शवणाऱ्या प्रेक्षकांना रोखण्यासाठी MCA ने अधिक सुरक्षारक्षक नेमल्याचे वृत्त खोटे आहे. ही निराधार अफवा आहे आणि अशा कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत, एमसीए बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहोत,''असे त्यांनी स्पष्ट केले.