मुंबई : बॉलिवूडपासून सुरू झालेली 'मीटू' मोहीम क्रीडाक्षेत्रातही उभी राहू लागली आहे. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केले आहेत. त्यानंतर बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानेही तिच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल खुलासा केला. क्रीडाक्षेत्राशी निगडीत असलेले आणखी एक प्रकरण समोर आले आहे. भारतातीत एका फ्लाईट अटेंडंटने श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटूवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.
श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाने मुंबईतील एका हॉटेलमध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भारतातील फ्लाईट अटेंडंटने केला आहे. घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिला आहे. 1996 च्या विश्वविजेत्या श्रीलंकन संघाचा कर्णधार रणतुंगा भारत दौऱ्यावर असताना हा प्रकार घडल्याचे त्या महिलेने सांगितले आहे. यात तिने सालाची माहिती दिलेली नाही. तिने लिहिले की,''भारत दौऱ्यावर आले असताना रणतुंगाने चुकीच्या पद्धतीने माझ्या कमरेत हात घातला होता. त्यानंतर मी रिसेप्शनकडे धावत गेले, परंतु त्यांनी हा तुमचा वैयक्तीक मुद्दा असल्याचे सांगितले. त्यांनी मला मदत केली नाही.''
त्या महिलेने फेसबुक पोस्टवर असे अनेक प्रसंग सांगितले.
रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने पहिले विश्वविजेतेपद जिंकले होते. त्यांनी 93 कसोटीत 5105 आणि 296 वन डे सामन्यांत 7456 धावा केल्या आहेत.