सिडनी: ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे. ऐतिहासिक विजय मिळवत पाहुण्या आफ्रिकन संघाने यजमानांना पराभवाची धूळ चारली. ऑस्ट्रेलियाच्या पुरूष क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या सामन्यात समालोचन करताना दिसला. स्टार्कची पत्नी ॲलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार असून सामन्यानंतर पती-पत्नी यांच्यातील संवाद समोर आला आहे. स्टार्कने आपल्या पत्नीला काही प्रश्न विचारले.
मिचेल स्टार्कने ॲलिसा हिलीला तिची सहकारी किम गार्थबद्दल प्रश्न केला. गार्थ गोलंदाजी करताना चेंडू जरा जास्तच पुढे टाकत होती? या प्रश्नावर आपल्या गोलंदाजाचा बचाव करताला हिलीने म्हटले, "ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज पहिल्यापासूनच अशा पद्धतीने गोलंदाजी करतात. तुला काही वेगळा सल्ला द्यायचा आहे का?" खरं तर स्टार्कची पत्नी ॲलिसा हिलीने ज्या पद्धतीने हे उत्तर दिले ते ऐकून मिचेल स्टार्क आणि त्याच्यासोबत असलेले सहकारी समालोचक हसू लागले.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वन डे सामना बुधवारी पार पडला. ऑस्ट्रेलियाला या सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला. पाहुण्या आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ४५ षटकांत ६ बाद २२९ धावा केल्या होत्या. २३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ २९.३ षटकांत केवळ १४९ धावांवर गारद झाला.
यजमान संघाची कर्णधार ॲलिसा हिलीला देखील या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. ती १० चेंडूत केवळ ४ धावा करून तंबूत परतली. कर्णधार बाद होताच ऑस्ट्रेलियन संघाच्या विकेटांची जणू काही मालिकाच सुरू झाली आणि ऑस्ट्रेलियाला निराशाजनक पराभव पत्करावा लागला.