नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघांचे प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मितालीसोबत असलेल्या वादाचा स्वीकार केला. ते म्हणाले, ‘मितालीसोबत आपले तणावपूर्ण संबंध आहेत. तिला सांभाळणे कठीण आहे. ती फार वेगळ्या प्रकारची खेळाडू आहे.’ त्याचवेळी ‘टी२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात मितालीला संघातून वगळणे हा पूर्णपणे सांघिक निर्णय होता, यामागे कोणतेही षड्यंत्र नव्हते,’ असेही पोवार यांनी स्पष्ट केले.
मितालीने मंगळवारी पोवार यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर पोवार बुधवारी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि महाप्रबंधक (क्रिकेट संचालक) साबा करीम यांना भेटले व आपली बाजू मांडली. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘पोवार यांच्या मते मिताली ही एकाकी राहणारी खेळाडू असून तिला आवरणे शक्य होत नाही. तिला उपांत्य फेरीतील सामन्यातून वगळणे हा सांघिक निर्णय होता. तिचा स्ट्राईकरेट कमी असल्यामुळे तिला संघातून वगळण्यात आले होते.
मात्र, आयर्लंड व पाकविरुद्ध तिच्यामुळे भारताने विजय साजरे केले. त्या वेळी तिचा स्ट्राईकरेट कमी नाही भासला का, असे विचारला असता, पोवार यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.’