ठळक मुद्देदोनशे वन डे सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटूवन डे क्रिकेटमध्ये 6000 धावा करणारी पहिली महिलाट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये दोन हजार धावा करणारी पहिली भारतीय
- स्वदेश घाणेकर
भारतीय महिला क्रिकेट संघाची बॅकबोन... क्रिकेट हा फक्त मुलांचा खेळ नाही, हे ठणकावून सांगणारी धाकड गर्ल... महिला क्रिकेटपटूच्या हक्कांसाठी जागृत असणारी आणि गरज पडल्यास त्यासाठी बंडाचे शस्त्रही उपसणारी... जिचा खेळ पाहून केवळ मुलीच नव्हे तर मुलांनाही महिला क्रिकेटपटूंचा आदर करावासा वाटला... महिला क्रिकेटपटूही विक्रमांचे इमले रचू शकतात, कधीकाळी त्या विक्रमांत पुरुष क्रिकेटपटूंनाही मागे टाकू शकतात, हा आत्मविश्वास जिने मुलींमध्ये निर्माण केला त्या मिताली राजचा हा अल्पपरिचय... भारतीय महिला संघाची कर्णधार मितालीने नुकताच वन डे कारकिर्दीतला २००वा सामना खेळला. हा पल्ला गाठणारी ती जगातील पहिलीच खेळाडू ठरली. १९ वर्षे २१८ दिवस तिने भारतीय संघाची सेवा केली आणि यापुढील अनेक वर्ष ती तशीच सेवा करत राहिल,यात तिळमात्रही शंका नाही. श्वास असेपर्यंत क्रिकेट खेळेन असे डायलॉग तिच्या तोंडून कधी एकले नाही... संघाला जोपर्यंत आपली गरज वाटते तोपर्यंत आपल्यातील १०० टक्के देत राहण्याची तिची वृत्ती आणि त्यामुळेच ती संघातील प्रत्येकीची मिताली 'दीदी' आहे. युवा कर्णधार हरमनप्रीत कौरशी सारेकाही आलबेल नसले तरी मितालीने त्याकडे फार लक्ष दिले नाही. भारतीय संघाला २०१८ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावण्याची संधी होती. पण, उपांत्य फेरीत संघातील सर्वात अनुभवी खेळाडू मितालीला बाकावर बसवले आणि इंग्लंडकडून भारत हरला. त्यावेळी मिताली व्यक्त झाली.. जवळपास २० वर्षांच्या कारकिर्दीत मिताली कदाचित प्रथमच व्यक्त झाली असावी. हे व्यक्त होणे तिला संघाबाहेर बसवले म्हणून नव्हते, तर वैयक्तिक स्वार्थामुळे भारतीय संघावर ओढावलेल्या पराभवाच्या नामुष्कीविरोधात होते. पण, या गोष्टीचा तिने संघातील एकजुटीवर परिमाण होऊ दिला नाही. आजही ती हरमनप्रीतसोबत व संघासोबत 'दीदी' या भूमिकेतच आहे. भारतीय महिला संघ कोणत्या परिस्थितीतून इथवर पोहोचला, याची जाण असल्यानेच तिचे पाय नेहमी जमिनीवर असतात. महिला क्रिकेटमधूनही कमाई होऊ शकते हे हेरल्यानंतर बीसीसीआयने मदतीचा हात पुढे केला. हो पण त्यांचा हा पुढाकारही तितकाच महत्त्वाचा होता. आज भारतीय महिला क्रिकेटला जे ग्लॅमर मिळत आहे, ते याच पुढाकारामुळे.२०१७ चा एक किस्सा सांगावासा वाटतो. भारतीय महिला वन डे वर्ल्ड कपचे उपविजेतेपद नावावर करून मायदेशी परतल्या. तेव्हा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी आयुष्यात प्रथमच अशी रॉयल ट्रीटमेंट मिळाल्याची भावना मितालीने व्यक्त केली होती. २० वर्षांच्या कारकिर्दीत ग्लॅमरच्या मागे ती कधी पळाली नाही, अजूनही ती तशीच आहे. मी मी करून मिरवणाऱ्यांत मितालीचा क्रमांक शेवटचाच असेल, ही खात्री आहे. भारतीय संघ आणि महिला क्रिकेटला मितालीने भरभरून दिले. राजस्थानमध्ये जन्मलेल्या, परंतु हैदराबाद येथे आयुष्य घालवलेल्या मितालीने अनेकींना प्रेरणा दिली. यापुढे ती जितकी वर्षे भारतीय संघाची सदस्य म्हणून राहिल तितकी वर्ष ती युवा खेळाडूंची एक सक्षम फौज उभी करून जाईल. आज भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू ( अनुभवी झुलन गोस्वामी वगळता) हा मितालीचा खेळ पाहूनच मोठी झाली आहे. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही युवा पिढी घडली आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेटसाठी मितालीचे योगदान दुर्लक्षित करण्यासारखे अजिबात नाही. उलट त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. 'लोकमत' परिवारातर्फे मितालीचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!
200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला
वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू
सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा करणारी पहिली भारतीय ( महिला व पुरुष क्रिकेटपटू)
महिलांच्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा करणारी पहिली
१७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण
पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी
तिसऱ्याच कसोटीत २१४ धावांची विक्रमी खेळी. महिला क्रिकेटपटूत सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा कॅरेन रोल्टनचा (२०९*) विक्रम मोडला