नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारताच्या महिला संघाने गुरुवारी न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवला. या सामन्यात मितालीने फलंदाजी आणि गोलंदाजी न करताच एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
भारताच्या पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही न्यूझीलंड दौऱ्याची विजयाने सुरुवात केली. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाडींवर भारतीय महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले 193 धावांचे लक्ष्य जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने सहज पार केले. महाराष्ट्राच्या पोरींच्या दमदार कामगिरीमुळे 2006 नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंड महिला संघावर न्यूझीलंडमध्ये विजय मिळवण्याचा पराक्रम केला. भारताने हा सामना 9 विकेट राखून सहज जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यात मितालीने सर्वात जास्त काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. मितालीला 19 वर्षे आणि 212 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झाले आहेत. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या क्लेयर शिलिंगटनच्या नावावर होता, तिने 19 वर्षे 195 दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळले होते.