वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानच्या बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि शान मसूदची कसोटी संघाच्या कर्णधारपदी वर्णी लागली. तर, शाहीन आफ्रिदीकडे ट्वेंटी-२० संघाची धुरा सोपवण्यात आली. पाकिस्तानी संघाचा खेळाडू वहाब रियाज मुख्य निवडकर्ता म्हणून कार्यरत असून त्यानेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची निवड केली. पण, शेजाऱ्यांनी आपला लाजिरवाणा विक्रम कायम ठेवत पुन्हा एकदा कांगारूंच्या धरतीवर निराशाजनक कामगिरी केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाचा संचालक म्हणून माजी खेळाडू मोहम्मद हफीजला संधी दिली आहे. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला तीन सामन्यांच्या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. पराभवाचे भन्नाट कारण सांगितल्यामुळे चर्चेत असलेला संघाचा संचालक हफीज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा सामना सिडनी येथे होणार आहे. यासाठी शेजाऱ्यांचा संघ मेलबर्नहून सिडनीला रवाना झाला. पण, संघाचा संचालक मोहम्मद हफीज त्याच्या बायकोसोबत कॉफी पीत राहिल्याने त्याचे विमान चुकले. पाकिस्तानातील वृत्तवाहिनी 'जिओ न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या संघाचा संचालक मोहम्मद हफीजचे मेलबर्न ते सिडनीचे विमान चुकले. हफीज आणि त्याची पत्नी विमानतळावर होते आणि कॉफी पीत होते, पण त्यांनी विमानाची वेळ तपासली नाही. नंतर या जोडप्याने काही तासांनंतर सिडनीसाठी दुसऱ्या विमानाने प्रवास केला. अलीकडेच हफीजने पाकिस्तानी खेळाडूंना तंबी देताना सांगितले होते की, खेळाडूंनी मैदानात सकारात्मकता दाखवली नाही तर दंड आकारला जाईल.
पाकिस्तानची फजिती
मालिकेतील अखेरचा सामना म्हणजे पाकिस्तानसाठी अस्तित्वाची लढाईच... ३ ते ७ जानेवारीदरम्यान तिसरी कसोटी खेळवली जाईल. खरं तर मागील २८ वर्षांत एकदाही शेजाऱ्यांना ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर विजय मिळवता आला नाही. त्यामुळे हा लाजिरवाणा विक्रम मोडण्याचे आव्हान शान मसूदच्या नेतृत्वातील संघावर आहे. या मालिकेनंतर पाकिस्तान न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार असून यासाठी संघाची घोषणा झाली आहे. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात प्रथमच पाकिस्तान न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -
शाहीन आफ्रिदी (कर्णधार), आमिर जमाल, अब्बास आफ्रिदी, आझम खान, अबरार अहमद, बाबर आझम, फखर झमान, हारिस रौफ, हसिबुल्लाह खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसिम, सहिबझादा फर्हान, सैय अयुब, उसामा मीर, झमान खान.
Web Title: Mohammad Hafeez misses flight to Sydney after running late ahead of 3rd test match between aus vs pak
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.