मुंबई : क्रिकेट जगतातील काही महान फलंदाजांना मैदानात निरोपाचा सामना खेळता आला नाही. काहींना खेळता आला, पण विजय मिळवता आला नाही. उदाहरण घ्यायचेच असेल तर राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यासारख्या महान फलंदाजांचे घ्या किंवा वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, झहीर खान यांचे. पण अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला मात्र थाटात निरोप मिळाला.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने 224 धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांचा हा तीन सामन्यांमधील दुसरा विजय ठरला. नबीचा हा अखेरचा कसोटी सामना होता. सामना जिंकल्यावर नबीला खेळाडूंनी 'गार्ड ऑफ हॉनर दिला'. या सामन्यात नेत्रदीपक कामगिरी केली ती कर्णधार रशिद खानने. या लढतीनंतर रशिदालाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक देण्यात आले. रशिदने हे पारिषोतिक नबीला समर्पित केले. त्यामुळे असा कारकिर्दीचा शेवट होण्यासाठी भाग्य लागतं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. आपल्या तिसऱ्याच कसोटी सामन्यात त्यांनी बांगलादेशवर विजय मिळवला. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळणाऱ्या संघावर मिळवलेला हा अफगाणिस्तानचा पहिला विजय आहे. कारण यापूर्वी अफगाणिस्तानने दुसऱ्या कसोटी सामन्यात आयर्लंडवर विजय मिळवला होता. पण पहिल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला होता.
अफगाणिस्तानच्या संघाला यापूर्वी काही जणं कच्चा लिंबू समजत होते. पण त्यांनी बांगलादेशसारख्या संघाला पराभूत करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. या पराभवानंतर आम्ही छोटे मियाँ राहिलो नाही, असेच अफगाणिस्तानतचे चाहते बांगलादेशवासियांना म्हणत असतील.
या विजयात अफगाणिस्तानचा कर्णधार रशिद खानने मोलाचा वाटा उचलला. रशिद हा सर्वात युवा कर्णधार ठरला होता. अफगाणिस्तानने बांगलादेशपुढे विजयासाठी 398 धावांचे आव्हान ठेवले होते. पण रशिदने सहा विकेट्स मिळवत बांगलादेशचे कंबरडे मोडले. त्यामुळेच बांगलादेशचा डाव 173 धावांवर आटोपला आणि अफगाणिस्तानने 224 धावांनी दणदणीत विजय मिळवला.