भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीनं गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेपासून मोहम्मद शमीच्या गोलंदाजीत धार दिसून आली आहे. त्याची गोलंदाजी अधिक भेदक झाली आहे. पत्नी हसीना जहाकडून सुरू असलेल्या आरोपांमुळे मोहम्मद शमी प्रचंड व्यथित झाला होता. मात्र त्यानं धडाकेबाज पुनरागमन केलं. मोहम्मद शमी मानसिकदृष्ट्या इतका कणखर कसा झाला, त्यामागची कहाणी भरत अरुण यांनी सांगितली आहे. भरत अरुण भारतीय संघाचे बॉलिंग कोच राहिले आहेत. त्यांचा कार्यकाळ नुकताच संपला.
वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे मोहम्मद शमी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. त्यावेळी तो क्रिकेट सोडणार होता, असं भरत अरुण यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 'त्यावेळी मी आणि रवी शास्त्रींनी शमीसोबत संवाद झाला. त्यातून बऱ्याच गोष्टी समजल्या. मला आयुष्याचा कंटाळा आलाय. मला सगळं काही सोडून द्यायचंय, असं त्यावेळी शमी आम्हाला म्हणाला होता,' असं अरुण यांनी सांगितलं.
तू रागावला असशील, तुझ्या मनात संताप असेल, तर त्याचा वापर तुझ्या गोलंदाजीत कर, असा सल्ला आम्ही शमीला दिला होता, अशी आठवण अरुण यांनी सांगितली. 'वेगवान गोलंदाजासाठी राग ही वाईट गोष्ट नाही. आम्ही शमीला एक महिन्यासाठी एनसीएमध्ये पाठवलं. शमी तिथे गेला. त्यानं फिटनेसवर मेहनत घेतली. तिथून तो परत आला. आता मी जग हलवून टाकू शकतो, असं त्यावेळी शमीनं म्हटलं होतं,' असं भरत अरुण यांनी सांगितलं.
हसीन जहाँचे शमीवर गंभीर आरोप
२०१८ मध्ये मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्या नात्यात कडवटपणा आला होता. जहाँनं मोहम्मद शमीवर मारहाणीचे आरोप केले होते. तिनं शमीविरोधात तक्रारदेखील दाखल केली होती. शमीच्या भावावरही आरोप करण्यात आले होते. शमीला एक मुलगी आहे. पत्नीच्या आरोपामुळे शमी चिंतेत होता. अनेक मुलाखतीदरम्यान त्यानं त्याची व्यथा मांडली होती. मात्र २०१८ नंतर शमीच्या गोलंदाजीची धार वाढली. त्याची गोलंदाजी अधिक भेदक झाली.
Web Title: Mohammed Shami Wanted To Give Up The Game says Team India Former Bowling Coach Bharat Arun
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.