नवी दिल्ली : ज्या दिवशी आपल्याला सर्वोच्च आनंद मिळाला, विश्वचषकाला गवसणी घातली त्यादिवशीच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला की तो दिवस अविस्मरणीय असाच. भारताचा विश्वविजेता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी आजचा दिवस म्हणजेच 2 एप्रिल ही तारीख खास असेल. कारण या दिवशी त्याच्या नेतृत्वाखाली 2011मध्ये भारताने विश्वचषकाला गवसणी घातली होती, तर याच तारखेला सात वर्षांनी धोनीला पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात सात वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर रंगलेला विश्वचषकाचा अंतिम सामना कोणताही भारतीय क्रिकेट रसिक विसरू शकत नाही. आज या विजयाला सात वर्ष पूर्ण होत असल्याने अनेकांकडून या अंतिम सामन्याच्या आठवणी जागवल्या जात आहेत. हा संपूर्ण सामना रंगतदार असला तरी भारतीयांच्या अंगावर रोमांच उभे करणारा ठरणारा क्षण ठरला तो म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने खेचलेला विजयी षटकार.
विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा देत असताना धोनीला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करणं, म्हणजे क्रिकेटपटूंसाठी योगायोगच. सोमवारी राष्ट्रपती भवनामध्ये पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते धोनीने पद्मभूषण पुरस्कार स्वीकारला.