Join us  

वेस्ट इंडिजचा दिग्गज म्हणतो... विराट कोहलीच्या यशाचा पाया महेंद्रसिंग धोनीनं रचला!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी दमदार होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 1:35 PM

Open in App

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी दमदार होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मायदेशातच नव्हे, तर परदेशातही कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजयी पताका फडकावला आहे. त्यामुळेच जगभरातील दिग्गज त्याचे फॅन्स झाले आहेत. 

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराही त्यापैकी एक आहे. कोहलीच्या कामगिरीनं त्याला प्रभावीत केले आहे आणि रांचीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत तो कोहलीला भेटण्यासाठी उत्सुक आहे. त्यानं कोहलीच्या नेतृत्वकौशल्याचे कौतुक केले आहे.  पण, त्याचवेळी कोहलीच्या यशाचा पाया माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं रचल्याचं मतही त्यानं व्यक्त केलं.

धोनीच्या नंतर कसोटी क्रिकेटचे नेतृत्व सांभाळणाऱ्या कोहलीनं 50 सामन्यात सर्वाधिक विजय मिळवले आहेत. लारा म्हणाला,''कोहली प्रतीभावान कर्णधार आहे. त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी करून अन्य सहकाऱ्यांसमोर उदाहरण ठेवले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या तालमीत कोहली चांगलाच तयार झाला आहे. त्यानं या यशाचा पाया रचला आहे आणि कोहली त्याच्यापरिनं ते यश पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.'' 

विराट कोहली रांचीत ऑसी दिग्गजाचा विक्रम मोडणार, इतिहास लिहिणार?तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून आफ्रिकेवर निर्भेळ यश मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. या कसोटीत कर्णधार कोहलीला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधाराचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कोहलीनं दुसऱ्या कसोटीत द्विशतकी खेळी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली... कसोटीतील 7000 धावांचा पल्लाही त्यानं पुणे कसोटीत पार केला. शिवाय सर्वाधिक डावानं कसोटी जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारात दुसरे स्थान पटकावले, अशा अनेक विक्रमांचा पुण्यात पाऊस पडला. रांचीतही कोहलीकडून हीच अपेक्षा आहे. या कसोटीत कोहलीनं शतकी खेळी करताच ऑसी दिग्गज रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला जाऊ शकतो. कोहलीचे हे कसोटी कारकिर्दीतील 27 वे शतक ठरेल, तर कर्णधार म्हणून 20वे शतक असणार आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांत कोहली थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेईल आणि पाँटिंगची तिसऱ्या स्थानी घसरण होईल.

 

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनी