भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी सायंकाली 7.29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. हा धक्का पचेपर्यंत भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुरेश रैनाच्या रुपानं दुसरा धक्का बसला. धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत रैनानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले हे दोन्ही खेळाडू बिग बॅश लीग, कॅरेबियन लीगमध्ये खेळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा उपकर्णधार सुरेश रैनानं महिन्याभरापूर्वी करारबद्ध नसलेल्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती बीसीसीआयकडे केली होती.
धोनीनं गतवर्षी भारताकडून अखेरचा वन डे सामना खेळला, तर रैनानं 2018मध्ये अखेरचे राष्ट्रीय प्रतिनिधित्व केलं होतं. दोघंही बीसीसीआयच्या करारात नाहीत आणि आता फक्त ते इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) CSK कडून खेळतात. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी रैनानं बीसीसीआयकडे करारबद्ध नसलेल्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती. त्यानं म्हटलं होतं की,''बीसीसीआयशी करारबद्ध नसलेल्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली गेली पाहिजे. बीसीसीआय आणि आयसीसी किंवा अन्य फ्रँचायझींनी मिळून यावर चर्चा करायला हवी.''
तो पुढे म्हणाला होता की,''युसूफ पठाण, मी, रॉबीन उथप्पा, आदी अनेक खेळाडू परदेशात जाऊन खेळू शकतात. आम्ही बीसीसीआयच्या करारात नाही. आमच्यापैकी काहींकडे आयपीएलचे करारही नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळत नाही आणि स्थानिक क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जाची तोड नाही. त्यामुळे सीपीएल किंवा बीबीएल सारख्या लीगमध्ये आम्हाला खेळण्याची संधी मिळल्यास, फायद्याचे ठरेल. राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी आम्हीही तयार असू. या लीगमध्ये अनेक देशांचे खेळाडू खेळतात.''
बीसीसीआयचा नियम काय सांगतो?बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळू शकत नाही. परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीयच नव्हे, तर स्थानिक आणि आयपीएलमधूनही निवृत्ती किंवा परवानगी घ्यावी लागेल. धोनी आणि रैना आता निवृत्त झाले आहेत आणि त्यांना परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआय नियमात बदल करते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनीचा पहिला पगार किती होता माहित्येय; आज 760 कोटींचा धनी
निवृत्तीच्या घोषणेनंतर मेहंद्रसिंग धोनी अन् सुरेश रैनानं मारली मिठी; पाहा इमोशनल Video
सुरेश रैनाचे 'हे' विक्रम तुम्हाला करतील चकीत!
... म्हणून महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ निवृत्तीसाठी सुरेश रैनानं 15 ऑगस्टचा दिवस निवडला
भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी तू एक आहेस - रोहित शर्मा
मला माहित्येय तुला रडावासं वाटतंय, पण...; पत्नी साक्षीची भावनिक पोस्ट