मुंबई क्रिकेट संघानं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेच्या सुपर लीग गटातील विजयी घोडदौड कायम राखली आहे. रविवारी झारखंडविरुद्ध पृथ्वी शॉच्या दमदार फटकेबाजीचा आस्वाद घेणाऱ्या मुंबईच्या पाठीराख्यांसाठी कर्णधार सूर्यकुमार यादवनं दमदार खेळी केली. पण, सूर्यकुमारला थोडक्यात शतकापासून वंचित रहावं लागल्याचं दुःख त्यांना सहन करावं लागलं. मुंबईनं सोमवारी झालेल्या या सामन्यात कर्नाटकवर 7 विकेट आणि 6 चेंडू राखून विजय मिळवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉनं मुंबईला धडाक्यात सुरुवात करून दिली. त्यानं 17 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 30 धावा केल्या. पण, त्यानंतर आदित्य तरे ( 12) आणि श्रेयस अय्यर ( 14) लगेच माघारी परतल्यानं मुंबईला धक्का बसला. कर्णधार सूर्यकुमारनं मुंबईचा डाव सावरला. त्यानं 53 चेंडूंत 11 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 94 धावा केल्या. शिवम दुबेनं 18 चेंडूंत 2 खणखणीत षटकार लगावताना नाबाद 22 धावा केल्या.