मुंबई : टी २० मुंबई लीग ही स्पर्धा मुंबईकर युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी असेल. यातून स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी युवा खेळाडूंना मिळणार असून त्यांना या स्पर्धेतून खूप शिकायला मिळेल. तसेच माझ्यामते आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मुंबईकर युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा पहिले पाऊल असेल, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने व्यक्त केले.गुरुवारी मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) बहुचर्चित टी२० मुंबई लीग क्रिकेट स्पर्धेची घोषणा केली. तसेच स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अभिनेता सैफ अली खान याच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी कांबळीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कांबळीने म्हटले की, आम्ही देखील आमच्या काळात टी २० क्रिकेट खेळलो आहेत. मी एकदिवसीय व कसोटी क्रिकेट या दोन्ही प्रकारात मनसोक्त फटकेबाजी केली असल्याने आमच्यावेळी अशी स्पर्धा नसल्याची खंत अजिबात नाही. त्याचप्रमाणे, या टी२० लीगमध्ये कोणत्या संघाने प्रशिक्षकपदासाठी माझ्याकडे विचारणा केल्यास मी नक्कीच त्यासाठी तयार होईल, असेही कांबळी म्हणाला.भारताच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौ-याबाबत कांबळीने म्हटले की, टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तिथले वातावरण वेगवान गोलंदाजीसाठी पूरक असून आपला संघ मजबूत फलंदाजीच्या जोरावर चांगली कामगिरी करतील असा विश्वास आहे. कांबळीने कोहलीचे कौतुक करताना सांगितले की, कोहलीचा फॉर्म जबरदस्त आहे. मी देखील खूप वर्षांआधी सलग दोन द्विशतक झळकावले होते. कोहलीने या कामगिरीची पुनरावृत्ती केल्याचा आनंद आहे. तसेच सध्या अजिंक्य रहाणे खराब फॉर्मशी झगडत असला, तरी एका मोठ्या खेळीतून त्याचा आत्मविश्वास नक्कीच परतेल, असा विश्वासही कांबळीने यावेळी व्यक्त केला.....................................४ ते ९ जानेवारी २०१८ दरम्यान रंगणा-या पहिल्या टी२० मुंबई लीग स्पर्धेत उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर, मध्य उत्तर, दक्षिण आणि मध्य दक्षिण अशा सहा विभागांतील प्रत्येकी एका संघाचा समावेश असेल. तसेच या लीगसाठी मुंबई विभागातील चमकदार खेळाडूंसह आयपीएलमध्ये छाप पाडलेल्या मुंबईकर खेळाडूंची यादी एमसीए तयार करणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने राऊंड रॉबिन पद्धतीने वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार असून, प्रत्येक दिवशी ३ सामने होणार असल्याची माहिती एमसीएकडून मिळाली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मुंबई लीग युवा क्रिकेटपटूंकरिता आयपीएलसाठी पहिले पाऊल- विनोद कांबळी
मुंबई लीग युवा क्रिकेटपटूंकरिता आयपीएलसाठी पहिले पाऊल- विनोद कांबळी
मुंबई : टी २० मुंबई लीग ही स्पर्धा मुंबईकर युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी असेल. यातून स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी युवा खेळाडूंना मिळणार असून त्यांना या स्पर्धेतून खूप शिकायला मिळेल.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 10:12 PM