प्रसाद लाड : लोणचं जसं मुरतं जातं, तसं ते अधिक रुचकर लागतं. पण खेळाडूंच्या बाबतीत मात्र ही गोष्ट लागू पडत नाही, असं काही जणांना वाटतं. याला अपवाद ठरला आहे तो म्हणजे वसिम जाफर. आपल्या नजाकतभऱ्या फटक्यांनी त्याने नेहमीच क्रिकेटच्या दर्दी चाहत्यांना भुरळ पाडली आहे. वाढतं वय, हा मुद्दा त्याच्यासाठी गौणच ठरतो. कारण वयाच्या चाळीशीतही त्याने साकारलेली 286 धावांची खेळी ही युवा खेळाडूंना लाजवणारी अन् वसिमला म्हातारा समजणाऱ्यांना 'बुढ्ढा होगा तेरा....' हे सांगणारी नक्कीच आहे.
जाफरची फलंदाजी म्हणजे तंत्रशुद्धतेचा उत्तम वस्तुपाठ. त्यचे फटके नजरेचे पारणे फेडणारे. बॅकफूटवर येऊन तो ज्या पद्धतीने कट आणि ड्राइव्ह्ज मारतो, ते पाहणं हा एक सोहळाच असतो. कारण त्याच्याएवढी पदलालित्यावरची हुकूमत सध्याच्या कोणत्याही क्रिकेटपटूकडे पाहायला मिळत नाही. जाफर तसा मितभाषी. बॅटनेच बोलायला तो जास्त प्राधान्य देतो. त्याचा खेळ बोलतो, धावा बोलतात.
जाफर हा मुंबईच्या फलंदाजीचा एकेकाळी कणा होता. मुंबईच्या फलंदाजीचे सारथ्य त्याने प्रामाणिकपणे केले. सलामीवीराचा खेळ कसा असायला हवा, हे जर कुणाला पाहायचे असेल तर त्यांच्यापुढे जाफर हा आदर्शवत पर्याय उपलब्ध आहे. सध्याच्या ट्वेन्टी-20च्या युगात त्याच्यासारखी तंत्रशुद्ध फलंदाजी पाहण्याचा योग फारसा येत नाही. इराणी चषकाच्या निमित्ताने तो आला. पहिल्या दिवशी त्याने शतक साजरे केले, दुसऱ्या दिवशी द्विशतक, त्यामुळे तिसऱ्या दिवशी तो त्रिशतक झळकावणार का, ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण यामध्ये तो फक्त 14 धावांनी अपयशी ठरला.
एकेकाळी त्याने ज्या मुंबईच्या संघाची मनोभावे सेवा केली, त्याच संघाने त्याच्यावर अन्याय केला. चांगल्या गुणवत्तेला कधीच मरण नसतं. तसं ते जाफरलाही नव्हतं. त्यामुळेच विदर्भासारख्या अनुभव नसलेल्या संघात तो दाखल झाला. आणि आश्चर्य... विदर्भाने रणजी करंडक जिंकला. आता ते इराणी चषक जिंकून इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत, ते जाफरच्याच जीवावर.
जाफर भारतीय संघाकडूनही खेळला. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धची त्याची द्विशतके विसरता येणं, अशक्यच. भारताकडून तो 31 सामने खेळला. त्यानंतर मात्र त्याला भारतीय संघाचे दार कधीच उघडले नाही. काही वर्षांपूर्वी भारतीय संघ सलामीवीराच्या शोधात होता. दुसरीकडे जाफरही चांगली फलंदाजी करत होता. पण मुंबईच्या ' त्या ' निवड समिती अध्यक्षाने जाफरला संधी दिली नाही. जाफर काही लाळघोटेपणा करणारा क्रिकेटपटू नक्कीच नाही. जाफरला कधीच स्वत:च्या खेळाचं मार्केटिंग करता आलं नाही. पण तरीही वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्याची 286 धावांची खेळी सारे काही बोलून गेली. आता त्याला भारतीय संघात स्थान मिळणार नाही. पण भारतीय संघातील खेळाडूंना जो इतिहास रचता येणार नाही, तो रचण्याच्या उंबरठ्यावर जाफर नक्कीच आहे.