ब्रिस्टल : इंग्लंडच्या टॅमी ब्युमंट (८९) आणि नताली स्किवर (७४) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारतावर मालिकेतील पहिल्या वनडेत ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने मिताली राजच्या अर्धशतकाच्या जोरावर २०१ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी फटकेबाजी करत ३४.५ षटकांतच २ बाद २०२ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या संघाने सुरुवातदेखील अडखळतच झाली होती. लॉरेन विनफिल्ड-हिल लवकर तंबूत परतली. त्यानंतर संघाची धावसंख्या ८३ असतांनाच कर्णधार हिथर नाईटही बाद झाली. अष्टपैलू नताली स्किव्हर आणि सलामीवीर टॅमी ब्युमंट यांनी फटकेबाजी करत एकही विकेट न गमावता संघाला विजय मिळून दिला. या दोघींनी ११६ चेंडूत ११९ धावांची भागीदारी केली. ब्युमंट हिने आपल्या खेळीत १२ चौकार आणि एक षटकार लगावला.
भारताच्या झुलन गोस्वामी आणि एकता बिश्त यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्याशिवाय एकाही गोलंदाजाला बळी घेता आला नाही.
त्याआधी भारतीय कर्णधार मिताली राज १०८ चेंडूत ७२ धावा केल्या. त्यात सात चौकार लगावले. तिच्या शिवाय इतर खेळाडूंना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पूनम राऊत(३२ धावा) सोबत तिने तिसऱ्या गड्यासाठी ५६ धावांची तर दीप्ति शर्मासोबत(३० धावा) पाचव्या गड्यासाठी ६५ धावांची उपयुक्त भागीदारी केली. मात्र संथ फलंदाजी आणि अखेरच्या पाच षटकांत पुरेशा धावा न करता आल्याने भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडची फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन हिने ४० धावा देत तीन बळी घेतले. त्यात हरमनप्रीत कौर आणि मिताली यांच्या बळींचाही समावेश होता. जलदगती गोलंदाज कॅथरीन ब्रंट आणि अन्या श्रबसोले यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारतीय संघासाठी पहिला वनडे सामना खेळणारी शेफाली वर्मा (१५ धावा) आणि स्मृती मंधाना (१० धावा यांना अपेक्षित सुरुवात करून देता आली नाही.
शेफालीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पिच चेंडूंनी तिची परीक्षा घेतली. ती सहज झेल देऊन तंबूत परतली. मंधांना ला श्रबसोले हिने बाद केले. १६ षटकांत भारतीय संघाला ५० धावाच करता आल्या. त्यानंतर पूनम आणि हरमनप्रीत एकापाठोपाठ तंबूत परतल्याने संघावर दबाव वाढला. मितालीने विकेट सांभाळून खेळ केला आणि स्ट्राईक रोटेट केल्याने भारताला २०० चा पल्ला गाठता आला.
मिताली राजचा विश्व विक्रम
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्यानंतर २२ वर्षे सलग वनडे क्रिकेट खेळणारी दुसरी क्रिकेटर बनली आहे. ३८ वर्षांच्या मिताली हिने २६ जून १९९९ मध्ये पदार्पण केले होते. रविवारी इंग्लंड विरोधातील मालिकेतील पहिल्या वनडेत खेळत तिने हा विक्रम केला आहे.
सचिनची कारकिर्द २२ वर्षे ९१ दिवसांची होती
Web Title: Natalie, Tammy's half-century, England win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.