नवी दिल्ली - आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये काही युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्या युवा चेहऱ्यांमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पारख करून मुख्य प्रवाहातील क्रिकेटमध्ये आणलेल्या एका खेळाडूचाही समावेश आहे. त्या खेळाडूचे नाव आहे नवदीप सैनी. युवा वेगवान गोलंदाज असलेल्या नवदीपला विंडीज दौऱ्यासाठी निवडलेल्या भारताच्या टी-20 आणि एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. मुळचा हरियाणातील असलेला नवदीप सैनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो. एकेकाळी कर्नाल येथे स्थानिक स्पर्धांमध्ये तो 200 रुपये प्रति समाना घेऊन खेळत असे. तसेच 2013 पर्यंत लेदर बॉलने खेळण्याचाही त्याला अनुभव नव्हता. मात्र दिल्लीचाच आणखी एक वेगवान गोलंदाज सुमित नरवाल याने त्याची गुणवत्ता पारख करून त्याला दिल्लीच्या नेट सेशनमध्ये बोलावले. येथे गौतम गंभीरने त्याची गोलंदाजी पाहिली. तसेच त्याला दोन बुटांचे जोड भेट दिले. तसेच नियमितपणे नेट सेशनमध्ये येण्यास सांगितले. येथूनच नवदीपच्या क्रिकेटमधील प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पुढे गौतम गंभीरनेच नवदीपची दिल्लीच्या संघात निवड करण्यासाठी निवड समितीकडे शब्द टाकला. त्यामुळे 2013-14 च्या हंगामासाठी सैनीची दिल्लीच्या संघात निवड झाली. त्यानंतर नवदीपने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2017-18 च्या मोसमात तर 8 सामन्यात 34 बळी टिपत नवदीपने दिल्लीला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2018 मध्ये अफगाणिस्ताविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यासाठी नवदीपची भारतीय संघात निवड झाली होती. तसेच यंदाच्या आयपीएलमध्येही नवदीपने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना आपली छाप पाडली होती.
दरम्यान, जेव्हा गौतम गंभीरचा विषय निघतो तेव्हा नवदीपचे मन भरून येते. गंभीरला तो स्वत:चा मेंटॉर मानतो. ''जेव्हा जेव्हा मी गंभीरबाबत बोलतो तेव्हा स्वत:ला भावूक झाल्यासारखे वाटते. जेव्हा मी दिल्लीसाठी काही सामने खेळले होते. तेव्हाच मी अशीच मेहनत करत राहिलो तर एक दिवस भारतीय संघासाठी खेळेन, असे गंभीरने मला सांगितले होते. गंभीरने माझ्यातील कौशल्य ओळखले. त्यामुळेच जेव्हा मी त्यांच्याबाबत विचार करतो तेव्हा मन आनंदित होते.'' असे सैनीने सांगितले.