मुंबई : खेळाडूला वयाचे बंधन नसते, हीच गोष्ट क्रिकेटपटू वसिम जाफरने दाखवून दिली आहे. सध्या सुरु असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाच्या संघाकडून खेळताना जाफरने एक नवा विक्रम बनवला आहे. जाफरने यंदाच्या मोसमात हजार धावांचा टप्पा गाठला आहे. दोन रणजी मोसमांमध्ये हजार धावा करणारा जाफर हा पहिला खेळाडू ठरला आहे.
रणजी स्पर्धेच्या इतिहासामध्ये जाफरच्याच नावावर सर्वाधिक धावा आहेत. 2008-09 साली मुंबईकडून खेळताना जाफरने 84च्या सरासरीने 1260 धावा केल्या होत्या. यावर्षी विदर्भाकडून खेळताना उपांत्य फेरीपूर्वी जाफरला हजार धावा पूर्ण करण्यासाठी 31 धावा कमी पडत होत्या. उपांत्य फेरीच्या पहिल्या दिवशी विदर्भाच्या उमेश यादवने सात बळी मिळवले होते. त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे केरळचा डाव 106 धावांमध्ये आटोपला होता. उपांत्य फेरीच्या लढतीत 34 धावा करत जाफरने हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
सध्याच्या घडीला जाफर 40 वर्षांचा आहे. पण तरीही त्याच्या धावांची भूक अजूनही कमी झालेली नाही. रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जाफरने दमदार अर्धशतक झळकावले होते. उत्तराखंडविरुद्धच्या या सामन्यात जाफरने 206 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली होती. या सामन्यापूर्वी जाफरने 251 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 57 शतकांच्या जोरावर 19,079 धावा केल्या होत्या.