Join us  

आयसीसी वन डे क्रमवारीत 'विराट'सेनेच्या स्थानाला न्यूझीलंडकडून धोका

भारत विरुद्ध न्यूझीलंड : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारताचा न्यूझीलंड दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 10:50 AM

Open in App
ठळक मुद्देवन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारताचा न्यूझीलंड दौरा महत्त्वाचा भारताला 2013-14च्या न्यूझीलंड दौऱ्यात 0-4 असा मार खावा लागला होतामहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2009 मध्ये वन डे मालिका 3-1 अशी खिशात घातली

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारताचा न्यूझीलंड दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ 10 वन डे सामने खेळणार आहे आणि त्यापैकी पाच सामने न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड येथील वातावरण समान आहेत आणि त्यामुळे न्यूझीलंड दौरा भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. न्यूझीलंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवणं सोपं नाही आणि त्यांच्याकडे वर्ल्ड कपचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे. त्यात या मालिकेत न्यूझीलंडकडून भारताच्या आयसीसी वन डे क्रमवारीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

आयसीसीच्या वन डे क्रमवारीत भारत आणि न्यूझीलंड अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील दोन वर्षांतील दोन्ही संघांची कामगिरी तुल्यबळ झालेली आहे. मात्र, घरच्या मैदानावर न्यूझीलंडची कामगिरी ही सर्वोत्तम ठरली आहे. त्यात भारताविरुद्ध त्यांचे पारडे नेहमी जड राहिले आहे. न्यूझीलंडमध्ये खेळलेल्या 35 सामन्यांत यजमानांनी भारताला 21 वेळा पराभवाची चव चाखवली आहे. 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर न्यूझीलंडचे घरच्या मैदानावरील विजयाची टक्केवारी 75 टक्के आहे. त्यांना 27 सामन्यांत केवळ 8 पराभव पत्करावे लागले आहेत.

घरच्या प्रेक्षकांसमोर न्यूझीलंडने ही कामगिरी कायम राखत भारतीय संघावर निर्भेळ यश मिळवल्यास आयसीसी क्रमवारीत ते दुसऱ्या स्थानावर झेप घेऊ शकतील. भारतीय संघ सध्या 121 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आठ गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानी आहे. भारताने 2013-14 मध्ये न्यूझीलंड दौरा केला होता आणि पाच सामन्यांच्या मालिकेत त्यांना 0-4 असा मार खावा लागला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2009 मध्ये वन डे मालिका 3-1 अशी खिशात घातली होती. न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकणारा तो भारताचा पहिलाच संघ होता.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडआयसीसीमहेंद्रसिंह धोनीविराट कोहली