कोलंबो : पहिल्या सामन्याची कसर भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या लढतीत भरून काढली. निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला 20 षटकांत 8 फलंदाज गमावत 139 धावा करता आल्या.
भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. बांगलादेशच्या दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली, पण त्यांना मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. जयदेव उनाडकटने सौम्य सरकारला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले, तर शार्दुल ठाकूरने तमीम इक्बालचा काटा काढला. विजय शंकरच्या सातव्या षटकामध्ये लिटॉन दासला 7 आणि 8 या धावसंख्येवर दोनदा जीवदान मिळाले. पण युजवेंद्र चहलने दासला (34) सुरेश रैनाकरवी झेलबाद केले. दासला तंबूत धाडल्यावर भारताच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या धावसंख्येवर अंकुश ठेवण्याचे काम चोख बजावले. अखेरच्या काही षटकांमध्ये सब्बीर रहमानने फटकेबाजी करत धावसंख्येमध्ये 30 धावांची भर टाकली. उनाडकटने आपल्या अखेरच्या षटकात त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
भारताकडून जयदेव उनाडटकने सर्वाधिक तीन बळी मिळवले. विजय शंकरच्या गोलंदाजीवर दासला दोनदा जीवदान मिळाले असले तरी त्याने बांगलादेशच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या सामन्यात जास्त धावा देणाऱ्या शार्दुलने बांगलादेशविरुद्ध 4 षटकांमध्ये 25 धावांमध्ये एक बळी मिळवला.