ठळक मुद्देया लढतीत भारतीय संघ गाफिल राहीला तर त्यांचासाठी हा सामना सोपा ठरणार नाही.
कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 लढतीत भारताला पराभव पत्करावा लागला होता. निदाहास चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत गुरुवारी भारतापुढे आव्हान असेल ते बांगलादेशचे.
पहिल्या लढतीत भारताकडून शिखर धवनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपली छाप पाडता आली नव्हती. कर्णधार रोहित शर्मा आणि सुरेश रैना हे दोन्ही अनुभवी फलंदाज संघात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून संघाला चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. धवन हा सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे त्याने कामगिरीत सातत्य राखणे महत्वाचे आहे. मनीष पांडे, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. शार्दुल ठाकूरला गेल्या सामन्यात एका षटकात 27 धावा मोजाव्या लागल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळणार का, हा कळीचा मुद्दा असेल. जयदेव उनाडकटकडूनली संघाला जास्त अपेक्षा असतील. वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनी गेल्या सामन्यात चांगला मारा केला होता. पण अखेरच्या षटकांमध्ये मात्र, भारताच्या एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नव्हती.
बांगलादेशच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल आहे. शकिब अल हसन या गुणी अष्टपैलू खेळाडूकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तमीम इक्बाल, महमुदुल्लाह, मुशफिकर रहिम यांच्याकडे फलंदाजीचा चांगला अनुभव आहे. मुस्ताफिझूर रहमानसारखा युवा वेगवान गोलंदाज बांगलादेशच्या ताफ्यात आहे. त्याला रुबेन होसेनची साथ मिळू शकते.
दोन्ही संघ चांगलेच समतोल आहेत. कारण भारताच्या संघात जास्त अनुभवी खेळाडू नाहीत. गोलंदाजांना तर जास्त अनुभव नाही. दुसरीकडे बांगलादेशच्या संघात कोणत्याही संघाला धक्का देण्याची कुवत नक्कीच आहे. त्यामुळे या लढतीत भारतीय संघ गाफिल राहीला तर त्यांचासाठी हा सामना सोपा ठरणार नाही.
उभय संघ यातून निवडणार
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकृूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज आणि रिषभ पंत
बांग्लादेश : मोहम्मदुल्लाह (कर्णधार), लिटन दास, तमीम इकबाल, सौम्या सरकार, मुश्फिकर रहीम, शब्बीर रहमान, मुस्तफिजुर रहमान, रुबेल हुसेन, अबू जायेद, तास्किन अहमद, इमरूल कायेस, नुरूल हसन, मेहदी हसन, आरिफुल हक, नजमुल इस्लाम, अबू हिदर रॉनी.
Web Title: Nidahas Trophy 2018 cricket tournament: India face Bangladesh challenge
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.