कोलंबो : भारतीय संघ सध्या निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेमध्ये आहे. यावेळी श्रीलंकेकडून भारतीय संघावर काही बंधने घातली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला श्रीलंकेकडून पाच विकेट्लने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या बुधवारी भारतीय संघाने संध्याकाळी हॉटेलमध्येच राहणे पसंत केले. श्रीलंकेमध्ये सध्याच्या घडीला आणीबीणी जाहीर केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना हॉटेलबाहेरही जाता आले नाही. त्याचवेळी समाजमाध्यमांवर बंधन असल्यामुळे भारतीय संघ काहीसा अस्वस्थ झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
भारतीय खेळाडू फक्त व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबूक, हेच वापरत नाहीत, तर काही संकेतस्थळांवरही ते जात असतात. श्रीलंकेमध्ये बुधवारपासून समाजमाध्यमांवर बंधन आणल्यामुळे भारतीय संघाच्या विरंगुळ्याचे साधन कमी झाले आहे.
आमच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपमध्ये मेसेज येतात, ते मला समजतेही, पण ते मेसेज आम्हाला दिसत नाहीत. त्याचबरोबर इन्स्टाग्राम, फेसबूक या गोष्टीही आम्हाला हाताळता येत नाहीत. श्रीलंकेत आणीबाणी असल्यामुळे त्यांच्या सरकारने केलेली ही गोष्ट चुकीची नाही, पण त्यांनी आमच्यासारख्या लोकांचाही विचार करायला हवा, असे संघाबरोबर असणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले.