कोलंबो : तिरंगी क्रिकेट मालिकेत रोहित शर्मावर भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आपल्या कामगिरीने अन्य खेळाडूंपुढे आदर्श निर्माण करणारा कर्णधार असायला हवा, असे म्हटले जाते. पण रोहितच्या बाबतीत असे होताना दिसत नाही.
निदाहास चषक तिरंगी क्रिकेट मालिकेत भारताचा पहिला सामना यजमान श्रीलंकेबरोबर सुरु आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. रोहित शर्मा सलामी करण्यासाठी मैदानात उतरला. रोहित आता नेतृत्व साभांळल्यावर कशी फलंदाजी करतो, यावर साऱ्यांच्या नजरा होत्या. डावाची सुरुवात करताना रोहित चाचपडत होता. पण कालांतराने रोहित स्थिरस्थावर होईल, असे चाहत्यांना वाटत होते. पण रोहितने यावेळी साऱ्यांचा भ्रमनिरास केला. पहिल्या षटकाच्या चौथ्याच चेंडूवर रोहित बाद झाला. यावेळी रोहितला भोपळाही फोडता आला नाही. पण शून्यावर बाद होण्याची रोहितची ही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी येथे 1 फेब्रुवारी 2012 साली पहिल्यांदा शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर 2016 साली पुण्यात झालेल्या लढतीत रोहित पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला होता. 1 मार्च 2016 ला श्रीलंकेविरुद्ध ढाका येथे झालेल्या सामन्यात रोहितला भोपळाही फोडता आला नव्हता. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीतही रोहितने आपले धावांचे खाते उघडला आले नव्हते. त्यानंतर या सामन्यात तो पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला.