प्रसाद लाड : क्रिकेट जगतात काही वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे संघ असे होते की, त्यांना जिंकण्याचे व्यसनच लागले होते. प्रतिस्पर्धी कुणीही असो, कोणत्याही देशात सामने असो, खेळपट्टी कशीही असो या दोन्ही संघांचा विजयाचा सूर्य काही वर्षांत मावळलाच नव्हता. सध्याच्या घडीला भारतीय संघ हा यशोशिखरावर आहे. त्यामुळे भारताचा एक पराभव झाला तरी चाहते त्याची जोरदार चर्चा करतात, टीकेची झोड उठते. निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला, कर्णधार रोहित शर्मा सध्या टीकेचा धनी ठरत आहे. पण जर रोहितने ही रणनिती वापरली तर त्याच्या ते फायद्याचे ठरू शकते.
भारताने आतापर्यंत जे ट्वेन्टी-20 सामने जिंकले आहेत, त्यावर नजर फिरवली तर त्यामध्ये भारताचे सारेच अनुभवी खेळाडू होते. पण या मालिकेसाठी भारताच्या बऱ्याच अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वाखालील या संघात अनुभवी खेळाडूंची उणीव जाणवत आहे. पण रोहितने जर या संघाचा अभ्यास केला तर त्याला योग्य रणिनती नक्कीच आखता येईल.
भारताला जर श्रीलंकेत सामने जिंकायचे असतील तर त्यांनी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यावर भर द्यायला हवा. कारण भारतीय संघात अनुभवी फलंदाज आहेत, पण गोलंदाजांकडे मात्र फारसा अनुभव नाही. त्यामुळे भारताने प्रथम गोलंदाजी करण्यावर भर द्यायला हवा. प्रथम गोलंदाजी केल्यावर भारतीय संघापुढे जे धावांचे आव्हान असेल ते त्यांच्या आवाक्यात असेल. सध्या भारतीय संघात जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूर हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्यावर रोहितने विश्वास ठेवायला हवा. युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर यांनाही संघात कायम ठेवायला हवे. गोलंदाजीमध्ये रोहितने जास्त बदल केले नाही तरी चालेल, पण प्रथम गोलंदाजी कशी येईल, हे त्यांना पाहायला हवे.
भारताकडे रोहित, शिखर धवन, सुरेश रैना हे तीन अनुभवी फलंदाज आहेत. हे पहिल्या तीन स्थानांवर फलंदाजीला येतात. पण हे तिघे झटपट बाद झाले तर भारताच्या विजयाचा मार्ग बिकट होऊ शकतो. त्यामुळे यापैकी एका फलंदाजाने चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर यायला हवे. कारण अखेरच्या षटकांमध्ये महेंद्रसिंग धोनी किंवा हार्दिक पटेल हे ज्यापद्धतीने आक्रमक फलंदाजी करतात तशी खेळी साकारणाऱ्या फलंदाजांची भारताला गरज आहे. मनीष पांडेसारख्या फलंदाजाला आत्मविश्वास देण्याची गरज आहे. कारण गेल्या सामन्यातही त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची उणीव जाणवत होती. दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांना अजूनही छाप पाडता आलेली नाही. या दोघांपैकी एकाला संघाबाहेर काढून लोकेश राहुलला संघात स्थान दिले तर भारताची फलंदाजी बळकट होऊ शकते. त्यामुळे भारताने धावांचा पाठलाग करण्याची रणनिती ठरवली तर त्यांना विजयासमीप पोहोचण्यात मदत होऊ शकते.